बनावट धनादेशाद्वारे रक्कम काढण्याचा प्रयत्न फसला
By admin | Published: May 9, 2016 02:06 AM2016-05-09T02:06:12+5:302016-05-09T02:06:12+5:30
धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून खात्यातून परस्पर १५ लाख रूपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. नालवाडी येथे शनिवारी ही घटना उघडकीस आली.
१५ लाखांचा धनादेश : बँकेच्या सतर्कतेने अनर्थ टळला
वर्धा : धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून खात्यातून परस्पर १५ लाख रूपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. नालवाडी येथे शनिवारी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालवाडी येथील नरेंद्र विठ्ठल उमाटे यांच्या नावे बॅँकेत असलेल्या खात्याचा धनादेश प्राप्त करून शीतल उमाटे व अजय भुते यांनी धनादेशावर बनावट स्वाक्षरी केली. त्यांच्या खात्यातून १५ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. बॅँकेतील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी धनादेश विड्राल न करता नरेंद्र उमाटे यांच्याशी संपर्क केला असता सर्व प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी नरेंद्र उमाटे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी शीतल उमाटे व अजय भुते यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
दारूविक्रीची माहिती दिल्यावरून महिलेला शिवीगाळ
वर्धा- दारूचा गाळप करून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या कारणावरून सुमित्रा कुरवाडे रा. सुकळी (बाई) या महिलेला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सुमित्राने दिलेल्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी विलास पारिसे, सुनील पारिसे, उत्तम पारिसे सर्व रा. सुकळी (बाई) या तिघांवर गुन्हा दाखल केला. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
शेतीच्या वादातून मारहाण
कारंजा (घाडगे)- शेतीच्या वादातून देवाजी मानमोडे यांना तुकाराम मानमोडे, हेमराज मानमोडे व ईश्वर मानमोडे या तिघांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना कारंजा तालुक्यातील सावल येथे शनिवारी रात्री घडली. सदर तिघांनी देवाजी यांना शेतात बांधून लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केले.
भरधाव वाहन चालविण्यावरून वाद
वर्धा- रस्त्याने जाताना वाहनाला साईड देण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादात मेटॅडोर चालकाला दुचाकीस्वाराने मारहाण करून जखमी केले. ही घटना सिंदी (रेल्वे) बस स्थानक परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. राजू बिजवार यांच्या तक्रारीवरून बबलू इंदर चंद्रावत याच्यावर कलम ३४१, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.