जैन स्थानकात संस्कारांच्या प्रदर्शनीने वेधले अनेकांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:52 AM2017-09-11T00:52:09+5:302017-09-11T00:52:42+5:30
स्थानिक जैन स्थानक येथे संस्काराची प्रदर्शनी हा कार्यक्रम मुनीश्री प्रश्मरतीविजयजी यांच्या मंगलचरणाने प्रारंभ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक जैन स्थानक येथे संस्काराची प्रदर्शनी हा कार्यक्रम मुनीश्री प्रश्मरतीविजयजी यांच्या मंगलचरणाने प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन मंदिरचे अध्यक्ष योगेंद्र फत्तेपुरिया तर प्रमुख अतिथी म्हणून जैन स्थानकचे अध्यक्ष स्वरूपचंद बोथरा उपस्थित होते.
आपण आजपर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तुंची, कपड्यांची, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे सेल लागलेली पाहिले असेल; पण ‘संस्कारांचा सेल’ हा कधीही पाहिला नसेल. संस्काराच्या सेलमध्ये आज येथे आपण कशाप्रकारे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंतच्या दिनचर्येत संस्कारांद्वारे बदल घडवून आणू शकतो, याचे संपूर्ण ज्ञान समाज बांधवांनी घेतले. आजच्या भौतिकतेच्या वादळात नष्ट होत असलेल्या संस्कारांच्या सुरक्षिततेकरिता जैनत्व सुरक्षा संघसद्वारे पहिल्यांदाच वर्धा येथे हे आयोजन करण्यात आले. जैन समाजाद्वारे या उपक्रमाची स्तूती केली जात आहे.
जैन समाजाच्या प्रत्येक कुटुंबांनी आपापल्या सदस्यांसोबत या प्रदर्शनीचा लाभ घेतला आणि आपल्या जीवनाला संस्कारांद्वारे कसे बदलता येईल, ही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.
जैनत्व सुरक्षा संघ हे राष्ट्रीय स्तराचे संघटन आहे. संस्कारांच्या सुरक्षिततेकरिता ते कार्यरत आहे. यात ११ सदस्यांची मूळ टीम आहे. याप्रमाणे देशाच्या १५ झोनमध्ये ११०० पेक्षा अधिक टीम कार्यरत आहे. जैनत्व सुरक्षा संघ संस्कारांच्या सुरक्षेकरिता अनेक प्रकल्प देशभरात चालवित आहे. संस्कारांची प्रदर्शनी हा त्याच उपक्रमातील एक प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले.