शेतकऱ्याचे वागणे आवाक्याबाहेरच होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:54 PM2018-07-22T23:54:34+5:302018-07-22T23:54:58+5:30
बँक व्यवस्थापकाच्या दालनात शेतकऱ्याने शासन, प्रशासन व मला अर्वाच्य शब्दात शिविगाळ केली. वारंवार सांगून सुद्धा ते बाहेर जात नव्हते. एका महिले समोर शेतकरी बोलत असलेली भाषा समजण्यापलीकडे होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : बँक व्यवस्थापकाच्या दालनात शेतकऱ्याने शासन, प्रशासन व मला अर्वाच्य शब्दात शिविगाळ केली. वारंवार सांगून सुद्धा ते बाहेर जात नव्हते. एका महिले समोर शेतकरी बोलत असलेली भाषा समजण्यापलीकडे होती. त्यामुळे त्यांच्यावर नकळत हात उगारण्यात आला, अशी माहिती. देवळीच्या तहसीलदार बाळू भागवत यांनी तहसील कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्याची मी मुलगी असल्याने मला त्यांच्या अडचणींची जाण आहे. त्यांच्या प्रती तेवढाच जिव्हाळा आहे. परंतु शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मला एकतर्फी दोषी ठरविले जात आहे. प्रत्यक्षात घटनेच्या दिवशी संतोष चौधरी हे अंदोरी येथील शेतकरी दारूच्या नशेत गोंधळ घालत होते. घटनेच्या दिवशी शासकीय कामानिमित्त मी अंदोरी येथे होते. दरम्यान या कास्तकाराने माझ्याकडे येवून बँक प्रशासनाची तक्रार केली. बँकेच्यावतीने शासनाच्या कर्जमाफीची दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबीची पडताळणी करण्यासाठी म्हणून संबंधित शेतकºयाला घेवून बँकेत गेले. बँक व्यवस्थापकाना विचारणा केली असता या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली बँकेचे पासबुक आणल्यानंतर त्यावर तश्या प्रकारची नोंद करणार असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले.
संबंधित कास्तकाराचा नवीन पीककर्जासाठी अर्जच नसल्याचा हा विषय नव्हता.
याबाबत संबंधित कास्तकाराला वारंवार सांगुन सुद्धा तो काही ऐकण्यास तयार नव्हता. दारूच्या नशेत सारखा बडबडत होता. शासन, प्रशासन व मला अर्वाच्य भाषेत बोलत होता. एक स्त्री म्हणून त्याचे माझ्यासोबत वागणे आवाक्याबाहेर होते. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.
या कास्तकाराविषयी माझ्या मनात जिव्हाळा नसता तर मी त्याला बँकेत घेवून गेलेच नसते. किंवा हा प्रकार झाल्यानंतर या कास्तकाराच्या चुकीबद्दल पोलीस प्रशासनाला कळविले असते. गरीब शेतकरी अडचणीत येवू नये म्हणून पोलिसात तक्रार दिली नाही, असेही तहसीलदार भागवत यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
देवळी तालुक्यात घटना वाढल्या
देवळी तालुक्यात शासकीय अधिकारी व शेतकरी यांच्यात संघर्षाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. विजयगोपाल येथील बॅक व्यवस्थापकास भाजप अध्यक्षांनी काळे फासल्याची घटना घडल्यानंतर आता तहसीलदार यांनी मारहाण केल्याचे प्रकरण घडले आहे. शेतकऱ्यांची चूक असल्याचा दावा भागवत यांच्या माहितीवरून दिसून येत आहे.