वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम
By admin | Published: June 5, 2015 02:04 AM2015-06-05T02:04:25+5:302015-06-05T02:04:25+5:30
प्रवासादरम्यान नागरिकांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याच्या कटकटीपासून सुटका देण्याकरिता वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम ...
वर्धा : प्रवासादरम्यान नागरिकांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याच्या कटकटीपासून सुटका देण्याकरिता वर्धा रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम (आॅटोमेटीक तिकीट व्हेंडर मशीन) सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना एक शंभर रुपयांचे कार्ड रेल्वे विभागाकडून विकत घ्यावे लागणार असल्याची माहिती नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंह यांनी वर्धेत गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
प्रवाश्यांनी विकत घेतलेल्या कार्डपैकी ५० रुपये त्यांना प्रवासाकरिता मिळतील व ५० रुपये रेल्वे विभागाच्या खात्यात जातील. हे कार्ड एक वर्षाकरिता राहील. सदर कार्डचे नुतनीकरण ५० ते ५०० रुपयांपर्यंत करता येणार आहे. यात दीडशे किलोमिटरच्या प्रवासादरम्यान प्रवाश्याला ५ टक्के सुट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच यावेळी विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.
२८ मेपासून रेल्वे प्रवासी पंधरवडा सुरू झाला आहे. हा पंधरवडा येत्या ९ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान वर्धा रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवाश्यांकडून त्यांच्या सूचना त्यांनी जाणून घेतल्या. त्यांच्याकडून अर्जही भरून घेतले. यात रेल्वे विभागाकडून असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक संमुत देऊळकर, वरिष्ठ विभागीय अभियंता एच.एन. कावरे, प्रसिद्धी अधिकारी आर. डी.पाटील यांच्यासह वर्धेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
वर्धा रेल्वे स्थानकावर एमएफसी
वर्धा रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना त्रास होणार नाही व त्यांना सर्वच सुविधा पुरविण्याकरिता स्थानकावर एमएफसी (मल्टी फंक्शन कॉम्प्लेक्स) बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या कामाला लावकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंदी (रेल्वे) येथे असलेल्या फाटकामुळे नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे नवे फाटक तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुलगाव येथील रेल्वे फाटकाजवळ असलेल्या अतिक्रमणामुळे त्याचा विस्तार करणे अडचणीचे जात आहे. यावर उपाय योजना आखण्यात येत असल्याचे सिंह यावेळी म्हणाले.
बजाच चौक परिसरात असलेल्या उड्डाण पुलाची रूंदी वाढविण्याच्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले.
नागपूर-यवतमाळ रेल्वे मार्गाला जमीन अधिग्रहणाचे ग्रहण
नागपूर-यवतमाळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्याचे काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यात अडचणी येत असल्याने त्याचे काम रखडले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास व्यापाराच्या दृष्टीने व प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने त्याचा लाभ होणे शक्य आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यंदाचे उदिष्ट १ लाख ८० हजार कोटी रुपयांचे
गत हंगामात रेल्वे विभागाची कमाई १ लाख ७५ हजार कोटी रुपये झाली आहे. ही कामाई प्रवाश्यांना मिळत असलेल्या सेवेचा पुरावा आहे. प्रवाश्यांच्या सेवा वाढविताना यंदाच्या सत्रात वाढ करून १ लाख ८० हजार कोटी रुपयांचे उदिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.