औरंगाबाद एक्स्प्रेस हायवे उठलाय जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:29 PM2019-07-04T21:29:17+5:302019-07-04T21:29:36+5:30
नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार्ग आता जीवघेणा ठरु लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : नागपूर ते औरंगाबाद हे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून पुलगाव बायपास मार्गे एक्स्प्रेस हायवे चालू करण्यात आला. परंतु या मार्गाच्या सदोष कामामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सोयीकरिता केलेला मार्ग आता जीवघेणा ठरु लागला आहे.
प्रवाशांचा हिताकरिता पुलगाव बायपास मार्गे सुरु केलेल्या एक्सप्रेस हायवेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी अल्पावधीतच वर्धा ते पुलगाव हा ४० किलो मीटरचा रस्ता खड्डयात गेला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या दोन दिवसात तीन अपघात घडले असून यामध्ये जवळपास सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. तसेच एका घराचेही नुकसान झाले असून ४ ट्रकही अपघातग्रस्त झाले आहे.
कंत्राटदाराने या रस्त्याचे काम पुर्ण केल्यानंतर कुठेही अपघातग्रस्त वळण किंवा पूल असल्याबाबतचे सूचना फलक लावलेले नाही. सोबतच गावाच्याजवळ किंवा या मार्गावरील शाळांजवळ कुठेही झेब्रा क्रॉसिंग किंवा गतिरोधक लावलेले नाही. त्यामुळे रस्तेविकास महामंडळ किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मापदंडाचीही कंत्राटदाराने पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. तरिही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भरधाव वेगाने जाणाºया ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे या रस्त्यावर तयार झाले आहे. या महामार्गावरील चौरस्त्याचर ढाबे व इतर व्यावसायिक अतिक्रम करुन सौदर्याला बाधा निर्माण करीत आहे. या सर्वामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे.
केंद्रातील रस्ते विकास मंत्रिपद तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्रिपद हे विदर्भाच्या वाट्याला आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई करुन नाचणगाव चौरस्त्यावर पोलीस चेकपोस्ट तयार करुन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह प्रवासी करीत आहेत.