२५ दिवसांपासून थांबलीत ऑटोची चाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:17+5:30

गत काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने झाल्याने ऑटोचालकांची संख्याही प्रचंड वाढली आहे. शहरात जवळपास १० ते १२ ठिकाणी ऑटो थांबे आहेत. नियमित प्रवाशांसह शाळेतील विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासोबतच शाळेतून परत आणण्यासाठी ऑटोचालकांना महिन्याकाठी पैसे दिले जातात. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील २५ दिवसांपासून देशासह राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी असल्याने संपूर्ण बाजारपेठ ठप्प आहे.

Auto wheels stop from 25 days | २५ दिवसांपासून थांबलीत ऑटोची चाके

२५ दिवसांपासून थांबलीत ऑटोची चाके

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ३,३४५ ऑटोरिक्षा। १४ हजार कुटुंबसंख्येवर ओढवले उपासमारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात साडेतीन हजारांच्या जवळपास ऑटोरिक्षा चालक आहेत. दररोज रेल्वेस्थानक, बसस्थानकावरील प्रवाशांची ने-आण आणि विद्यार्थ्यांना शाळेत सोडून मिळणाऱ्या पैशावर आॅटोचालकांचा चरितार्थ चालतो. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे ऑटोचालकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
गत काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने झाल्याने ऑटोचालकांची संख्याही प्रचंड वाढली आहे. शहरात जवळपास १० ते १२ ठिकाणी ऑटो थांबे आहेत. नियमित प्रवाशांसह शाळेतील विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासोबतच शाळेतून परत आणण्यासाठी ऑटोचालकांना महिन्याकाठी पैसे दिले जातात. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील २५ दिवसांपासून देशासह राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी असल्याने संपूर्ण बाजारपेठ ठप्प आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शाळाही बंद आहेत. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाची एसटी बससेवा आणि रेल्वेसेवाही ठप्प आहे. अनेकांचे पोट या व्यवसायावरच आहे. मात्र, २५ दिवसांपासून ऑटोची चाके जागीच थांबल्याने ऑटोचालकांचा हक्काचा रोजगार बनद झाला आहे.
काही ऑटोचालकांनी बँकांचे कर्ज घेऊन ऑटोरिक्षाचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, व्यवसाय ठप्प झाल्याने बँकेचा हप्ता कसा भरायचा, असा प्रश्न अनेक ऑटोचालकांसमोर उभा ठाकला आहे. कोरोना विषाणूचा फटका ऑटोचालकांसोबतच तीनचाकी रिक्षाचालकांनाही बसला आहे.

आर्थिक मदतीची चालकांची मागणी
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने २३ मार्चपासून लॉकडाऊनचा अंमल केला आहे. लॉकडाऊनला जवळपास महिना पूर्ण होत आहे. मागील पंचवीस दिवसांपासून शहरातील सर्वच ऑटोरिक्षा चालक घरीच बसून आहेत. अजून किती दिवस घरी बसावे लागणार, हेही सध्या सांगणे अवघड असल्याने ऑटोचालकांसह मालक चिंतित आहेत. अनेकांचा ऑटोवरच उदरनिर्वाह आहे. शासनाने ऑटोचालकांना आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे ऑटोचालक प्रकाश कुबडे यांनी सांगितले.

अनेक ऑटोचालक उच्च शिक्षित
वर्धा शहरात साडेतीन हजार ऑटोरिक्षा असून यातील अनेक ऑटोचालक-मालक उच्च शिक्षित आहेत. अनेकांनी शासकीय नोकरीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, अपयशच आल्याने हताश होत अनेकांनी ऑटोव्यवसाय स्वीकारला आहे. या व्यवसायातील तुटपुंज्या मिळकतीतूनच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

बँकांचे हप्ते कसे भरावे?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे मागील २५ दिवसांपासून ऑटोरिक्षा घरीच उभे आहेत. अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन ऑटोरिक्षा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, व्यवसायच ठप्प असल्याने बँकांचे हप्ते भरायचे कसे, असा सवाल ऑटोचालक रवी काळपांडे, धनराज शेलोकार, मनोहर कुबडे, पंकज झाडे यांनी केला आहे.

Web Title: Auto wheels stop from 25 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.