सरासरी ६६.६३ मिमी पाऊस
By admin | Published: September 19, 2015 03:22 AM2015-09-19T03:22:06+5:302015-09-19T03:22:06+5:30
जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी सकाळीही सुरूच होता. यात सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ...
नदी-नाले फुगले : सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यात
वर्धा : जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी सकाळीही सुरूच होता. यात सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६६.६३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. वर्धा, सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर या चार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद सकाळी करण्यात आली.
जिल्ह्यात सर्वदूर आलेल्या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. काही धरणात पाण्याची पातळी क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने त्यातून पाणी सोडण्यात आले. यात निम्न वर्धा धरणाची रात्री १०.३० वाजता पूर्ण ३१ दारे ५० सेमीने उघडण्यात आली. यातून १००७ क्युमेक्स पाणी सोडल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टी झालेल्या समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला धरणाची दोन दारे गुरुवारीच सकाळी उघडण्यात आली होती. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. जिल्ह्यात शुक्रवारीही काही भागात दिवसभर पाऊस सुरू असल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)