आर्द्राच्या अखेरपर्यंत सरासरी २४७ मिमी पाऊस
By Admin | Published: July 5, 2017 12:22 AM2017-07-05T00:22:01+5:302017-07-05T00:22:01+5:30
जिल्ह्यात दररोज पाऊस येत आहे. येत असलेला पाऊस नियमित नसल्याने त्याची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत सध्या पाऊस कमीच
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात दररोज पाऊस येत आहे. येत असलेला पाऊस नियमित नसल्याने त्याची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारला आर्द्रा नक्षत्राचा अखेरचा दिवस होता. या नक्षत्रापर्यंत जिल्ह्यात सरसरी २४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी जुलै महिन्यापर्यंत २५४ मिमी पावसाची नोंद झाली होती.
उद्या बुधवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. आद्राच्या अखरेच्या दिवशी दुपारी वर्धेत पावसाने हजेरी लावली. दोन दिवसाच्या विश्रातीनंतर हा पाऊस आला. याची मोजणी बुधवारी सकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सरासरी १,१२१ मीमी. पावसाची नोंद होणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमीच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात झालेली सर्वाधिक नोंद सरासरी ९२०.७१ मीमी. एवढी आहे. पावसाच्या चार महिन्यात झालेली सरासरी महत्त्वाची धरली जाते.
यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोरडे पडलेले जलसाठे भरल्याचे दिसून आले आहे. गत पावसाळ्यात या काळात जिल्ह्यातील एकूण चार जलाशय कोरडे असल्याची नोंद आहे. यंदा मात्र तसे नाही. जिल्ह्यातील सर्वच जलाशयात पाणी असल्याचे दिसून आले आहे. पावसाचे अजून दोन महिने बाकी आहेत.
कोरड्या जलाशयात आले पाणी
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी झालेल्या पावसाने कोरड्या पडलेल्या जलाशयात पाणी आल्याचे झालेल्या नोंदिवरून दिसून आले आहे. आजच्या स्थितीत बोर प्रकल्पात १४.७६ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. धाम प्रकल्पात २०.५४, पोथरा २६.४७, पंचधारा २४.३४, डोंगरगाव १५.८९, मदन ३७.१४, मदन उन्नई ५.९७, लालनाला १२.३५, नांद १९.३४, उर्ध्व वर्धा ३५.१९, निम्न वर्धा १७.५८, बेंबळा २६.८२ तर सुकळी लघु प्रकल्पात आजच्या घडीला एकूण २५.२७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
मंगळवारी वर्धेत ११.३४ मिमि पावसाची नोंद
मंगळवारी वर्धा शहरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. दुपारपासून सायंकाळपर्यंत ११.३४ मिमि पावसाची नोंद झाली आहे.