जलाशयात सरासरी २१ टक्केच पाणी
By admin | Published: April 8, 2017 12:26 AM2017-04-08T00:26:41+5:302017-04-08T00:26:41+5:30
उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.
धोक्याची घंटा : एकाने तळ गाठला, तीन मार्गावर
वर्धा : उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. जिल्ह्यातील एका प्रकल्पाने तळ गाठला तर तीन प्रकल्प या मार्गावर आहे. लघु प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प कोरडे झाले आहे. उर्वरीतही प्रकल्पांची स्थितीही नाजुक आहे. १५ मोठे व मध्यम प्रकल्पात सरासरी २१ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने ही धोक्याची घंटा आहे.
जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प म्हणून १५ प्रकल्पांची नोंद पाटबंधारे विभागात आहे. याच विभागाकडून पाण्याची पातळी नोंदविली जाते. ही पातळी नोंदविली जात असताना यात वाढत्या तापमाणामुळे ती सतत खालावत असल्याचे समोर येत आहे. दिवसागणीक पातळीत घट होत असल्याचे दिसत आहे. या १५ प्रकल्पात सरासरी २१.६६ टक्के जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या १५ पैकी मदन (उन्नई) प्रकल्पाने तळ गाठला आहे. तर पोथरा, लालनाला आणि नांद तळ गाठण्याच्या मार्गावर असल्याचे उपलब्ध जलसाठ्यावरून दिसत आहे. असे असले तरी सध्या असलेली स्थिती ही गत वर्षीच्या तुलनेत बरी असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्याला पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता धाम प्रकल्पातील जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. या धरणात पाणी असल्याने वर्धा शहराला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पात गत वर्षीच्या तुलनेत अधिक साठा आहे. येथे यंदाच्या उन्हाळ्यात २०.२० दलघमी उपयुक्त साठा आहे. गत वर्षी तो आजच्या तारखेला १४.३९ दलघमी होता. यामुळे शहरवासीयांना पाण्याकरिता भटक्ंती करण्याची गरज नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.(प्रतिनिधी)
पिण्याकरिता ११.२९ दलघमी पाणी आरक्षित
धाम प्रकल्पातून वर्धा शहराला पाणी पुरविण्यात येते. या जलाशयात असलेल्या जलसाठ्यापैकी ११.२९ टक्के जलसाठा पिण्याकरिता आरक्षित ठेवण्यात आला आहे. यात ५.७९ दलघमी साठा नगर परिषदेकरिता तर ५.५० दलघमी पाणी जीवन प्राधिकरणकरिता राखीव ठेवण्यात आले आहे.
रेल्वेकरिता ०.५३ दलघमी पाणी
वर्धेतील काही जलाशयातून रेल्वे प्रशासनाकरिताही पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यात ०.५३ दलघमी पाणी रेल्वेकरिता आरक्षित करण्यात आले आहे. यातील काही पाणी नुकतेच सोडण्यात आले आहे.
उद्योगाकरिता २.३८ दलघमी पाणी आरक्षित
जिल्ह्यात असलेल्या जलसाठ्यापैकी २.३८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यातील एमआयडीसीकरिता ०.४३ दलघमी तर उत्तम व्हॅल्यू कंपनीकरिता १.९५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.