हॉटेल हॉलिडेच्या ४२ दुकानांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:27 PM2019-01-24T22:27:25+5:302019-01-24T22:28:50+5:30
स्थानिक हॉटेल हॉलिडे रिसोर्ट परिसरातील तब्बल ४२ दुकानांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. ही कारवाई गुरुवारी पोलिसांच्या बंदोबस्तात व प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आल्यामुळे आता या व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक हॉटेल हॉलिडे रिसोर्ट परिसरातील तब्बल ४२ दुकानांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. ही कारवाई गुरुवारी पोलिसांच्या बंदोबस्तात व प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आल्यामुळे आता या व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
येथील बजाज चौकात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे हॉटेल हॉलीडे रिसोर्ट आहे. हे रिसोर्ट चालविण्याचा कंत्राट पर्यटन विकास महामंडळाने १९९५ मध्ये वर्धा हॉटेल प्रा.लि. यांना दिला होता. या कंत्राटदार कंपनीने दरम्यानच्या काळात पर्यटन विकास महामंडळाची परवानगी न घेता; एक मजल्यापर्यंत बांधकाम करीत अनेक दुकानांची निर्मिती केली. तसेच ही दुकाने उपलब्ध करुन दिली. त्यामुळे या जागेवर अनेकांनी आपली दुकानदारी थाटली. याची माहिती पर्यटन विकास महामंडळाला होताच त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरु केली. तेव्हा त्यांना कंत्राटदाराने तब्बल ७ हजार ६६५ चौरस मीटर परिसरात दुकानाचे गाळे बांधल्याचे निदर्शनास आले. तसेच याच परिसरात मंगल कार्यालय वजा सभागृह बांधण्यात आल्याने काही वर्षांपूर्वी त्यावरही कारवाई करण्यात आली.
आज पुन्हा पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने व्यावसायीक संकटात आले असून कंत्राटदाराच्याही पायाखालची वाळू सरकली आहे.
न्यायालयाच्या आदेशाने कारवाईचा बडगा
पर्यटन विकास महामंडळ आणि गाळेधारकांतील हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. न्यायालयाने एका प्रकरणातील दोघांना ६ लाख रुपये तर दुसºया प्रकरणातील ३० जणांना ८२ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिलेत. पण, ही रक्कम जमा केली नाही. इतकेच नाही तर पर्यटन विकास महामंडळाकडून संबंधित गाळेधारकांना नोटीसही बजावण्यात आल्या. त्याकडेही दुर्लक्ष केल्याने अखेर आज दुकानांचा ताबा घेतला.
न्यायालयाच्या निदेर्शानंतरही गाळेधारकांनी रक्कम भरली नाही. ही रक्कम भरण्यासंदर्भात वारंवार नोटीस देण्यात आल्यात. पण, त्यांनी याकडेही दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली. गाळ्यांच्या कुलूपांना सिल लावले असून, येथील मार्गही बंद करण्यात येणार आहेत. तसेच कुणी सिल तोडण्याचा किंवा रस्ता उघडण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल.
-प्रशांत सवाई, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.