महात्मा गांधीच्या उपोषण शस्त्राचा दुरूपयोग टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:45 PM2018-04-13T23:45:34+5:302018-04-13T23:45:34+5:30
स्वातंत्र्य चळबळ व आंदोलनात ब्रिटीश सरकारच्या विरोधात उपोषण या शक्तीशाली शस्त्राचा उपयोग राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी केला होता. अलीकडे सत्ताधारी भाजप व विरोधक काँग्रेस यांनी मात्र उपोषण या शब्दाची व शस्त्राची अवहेलना चालविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : स्वातंत्र्य चळबळ व आंदोलनात ब्रिटीश सरकारच्या विरोधात उपोषण या शक्तीशाली शस्त्राचा उपयोग राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी केला होता. अलीकडे सत्ताधारी भाजप व विरोधक काँग्रेस यांनी मात्र उपोषण या शब्दाची व शस्त्राची अवहेलना चालविली आहे. त्यांना सद्बुद्धी लाभो यासाठी शुक्रवारी वर्धेच्या युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेने आश्रमसमोर दिवसाचे उपोषण केले.
सेवाग्राम आश्रम जगासाठी प्रेरणा देणारे असून गांधीजींनी याच आश्रमातून स्वातंत्र्य चळवळ अधिक प्रभावी बनविली. सत्य, अहिंसा आणि उपोषण हे बापूचे खरे शस्त्र. उपोषण व सत्याग्रहाला सत्य व अहिंसेचे बळ होते. यावरच जनतेची श्रद्धा व विश्वास असल्याने आंदोलनात देशवासी सहभागी झाले. अन्यायाविरुद्ध व मागण्यांसाठी बापूंनी उपोषण केले. यात प्रामाणिकपण होते. अलीकडे काँग्रेस व सत्ताधाऱ्यांनी लोकसभेत गदारोळ केला म्हणून भाजपाने उपोषण केले. देशातील दोन मुख्य राजकीय पक्ष बापूंच्या सशक्त उपोषण मार्गाची टिंगल करीत असल्याचे दिसते. उपोषण कसे कराचे हे बापूंनी सांगितले. आणि बापूंच्याच आश्रम समोर युवा परिवर्तन की आवाज या संघटनाने उपोषण करुन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सद्बुद्धी लाभो यासाठी बापूंच्या उपोषणाचा मार्ग अवलंबिला. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टि.आर.एन.प्रभु यांनी उपोषण स्थळाला भेट दिली. गांधीजींच्या प्रतिमेला सुतमाळ अर्पण करुन बापूंच्या मार्गाने युवक वाटचाल करीत आहे. त्यांच्या विचार व कार्यावर श्रद्धा असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
या उपोषणात युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हाध्यक्ष पलाश उमाटे, समीर गिरी, गौरव वानखेडे, शेखर इंगोले, अभिषेक बाळबुधे, सोनू दाते, सौरभ माकोडे, अक्षय बाळसराफ, स्वप्नील दौड आदी सहभागी झाले.