न्यायालयीन खटला जिंकूनही कामावर रूजू करण्यास टाळाटाळ
By Admin | Published: February 7, 2017 01:10 AM2017-02-07T01:10:51+5:302017-02-07T01:10:51+5:30
कामावर रूजू करून घेण्याबाबत न्यायालयातील खटला जिंकूनही बोरगाव (मेघे) येथील रहिवासी असलेल्या विनायक थूल यांना कामावर रूजू करून घेण्यात आले नाही.
अडीच दशकांपासून तगमग : भारतीय खाद्य निगमच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वर्धा : कामावर रूजू करून घेण्याबाबत न्यायालयातील खटला जिंकूनही बोरगाव (मेघे) येथील रहिवासी असलेल्या विनायक थूल यांना कामावर रूजू करून घेण्यात आले नाही. यातून स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा अवमानच केला आहे. शिवाय रूजू करून न घेतल्याने थूल कुटुंबियांची उपासमार होत आहे. गत २६ वर्षांपासून रूजू करून घेण्यासाठी त्यांचा लढा सुरू असून संघटनाही समस्या समजून घेण्यास तयार नसल्याने ते त्रस्त आहेत.
बोरगाव (मेघे) येथील विनायक थूल हे वर्कर्स युनियनच्या माध्यमातून भारतीय खाद्य निगमच्या सेवेत १९८७ ते १९९० या कालावधीत कार्यरत होते. १९९० मध्ये माथाडी युनियन व वर्कर्स युनियनने संप केला होता. हा संप सुमारे तीन महिने सुरू होता. संपाच्या काळात माथाडी कामगाराचा मृत्यू झाल्याने काही कामगारांना तुरूंगात डांबण्यात आले होते. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. तीन वर्षानंतर माथाडी कामगार तसेच युनियनच्यावतीने कामगार न्यायालयात कामगारांना कामावर घेण्याकरिता खटला दाखल केला होता. कामगार न्यायालयात युनियनच्या बाजूने निकाल लागला. दरम्यान, संघटनेच्या तत्कालीन अध्यक्षांनी जवळच्या कामगारांना कामावर रूजू करून घेतले. मला रूजू करून घेण्यात आले नाही, असा आरोप थूल यांनी केला आहे. कामावर पूर्ववत रूजू करून घेण्याकरिता वारंवार कार्यालयाच्या चकरा मारल्या; पण कुणीही लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सध्या हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. थूल कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट आले आहे. वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी या समस्येची दखल घेत त्यांना कामावर रूजू करून घ्यावे, अशी मागणी विनायक थूल व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)