पॉलिसीची रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ
By admin | Published: November 13, 2016 12:48 AM2016-11-13T00:48:34+5:302016-11-13T00:48:34+5:30
हिंदनगर भागातील रहिवाशी उमेश दिनकर इंगोले यांनी एका राष्ट्रीयकृत कंपनीकडून विमा घेतला.
वर्धा : हिंदनगर भागातील रहिवाशी उमेश दिनकर इंगोले यांनी एका राष्ट्रीयकृत कंपनीकडून विमा घेतला. पॉलिसी काढून दोन हप्ते भरल्यानंतर त्यांचे कर्करोगाने निधन झाले. या प्रकरणातील मृताच्या परिवाराला विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते; ण विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत विम्याची रक्कम मिळवून देण्याची मागणी मृताच्या आई-वडिलांनी केली आहे.
मृतक उमेश इंगोले यांनी काढलेल्या पॉलिसीची मुदत ३० वर्षाची होती. त्यांनी ती २०१४ मध्ये काढून दोन हप्त्याचा भरणा केला होता. यानंतर उमेश इंगोले यांचे कर्करोगाने २९ आॅक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. विम्याची ५० लाखांची रक्कम मिळावी या उद्देशाने उमेशच्या आई-वडिलांनी विमा कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार कागदपत्रांची पुर्तताही केली. कागदपत्रे देऊन एक वर्षांचा कालावधी लोटला; पण विम्याची रक्कम न मिळाल्याचा आरोप मृतकाच्या वडिलांनी केला आहे. अनेकदा विचारणा करूनही सदर प्रकरणाची फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक वर्षापासून अधिकारी एकच उत्तर देत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत विम्याची रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी मृतकाचे वडील दिनकर इंगोले यांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)