पुरस्कारप्राप्ती यशाचे गमक नव्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:02 PM2019-01-14T22:02:52+5:302019-01-14T22:03:11+5:30
आजपर्यंतच्या सेवाकाळात सपत्नीक सत्कार हा प्रथमच होत असल्याने वर्धेकरांच्या भरभरून प्रेमाचीच ही पावती आहे. हा सत्कार आम्ही दोघेही कधी विसरणार नाही असे उद्गार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आजपर्यंतच्या सेवाकाळात सपत्नीक सत्कार हा प्रथमच होत असल्याने वर्धेकरांच्या भरभरून प्रेमाचीच ही पावती आहे. हा सत्कार आम्ही दोघेही कधी विसरणार नाही असे उद्गार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले.
सावरकर सामाजिक सेवा समिती आणि सावरकर स्मारक नागरी समिती च्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची महाराष्ट्र शासनकडून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी स्मारक नागरी समितीचे अध्यक्ष हरीभाऊ वझुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, नवाल, सावरकर सेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर उपस्थित होते.
याप्रसंगी सक्षम संस्थेचे नरेंद्र नरोटे, भोजराज पाटील तसेच सावरकर भक्त मंडळाचे संजय ठाकरे, अजय गांडोळे, रवी सातदेवे यांनीही जिल्हाधिकारी यांचा सत्कार केला. याप्रसंगी संक्रांतीच्या पावन पर्वावर शैलेश नवाल यांच्या पत्नीचा ज्योती देशपांडे, माधवी व्यास आणि डॉ. स्मिता तराळे यांनी साडी, सौभाग्य साधने आणि ओटी भरुन सत्कार केला. सत्काराला उत्तर देतांना त्या म्हणाल्या समाजातील चांगल्या परंपरा ज्या संस्कार करणाऱ्या असतात त्याची जोपासना झालीच पाहिजे. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले नगरातील थोर महात्म्याचे पुतळे आणि स्मारक ही नागरिकांना राष्ट्र आणि समाजसेवेची प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त असतात. वर्तमान समाजात मुल्य घसरत चालली आहे. यशस्वी होण्याच्या परिभाषेत परिवर्तन झाले आहे. पुरस्कार प्राप्ती हे यशाचे गमक नव्हे.
याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे म्हणाले सावरकरांचे स्मारक हे माझे आहे. यात माझेही योगदान आहे. ही भावना जनमानसात रुजण्यासाठी प्रत्येकाने यशाशक्ती सहकार्य भावना ठेवावी. यथाशक्ती नगर परिषद सहकार्य करेलच पण हे स्मारक जनसामान्याच्या भावनाचे प्रतीक व्हावे ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल.
स्मारक नागरी समितीचे अध्यक्ष हरीभाऊ वझुरकर म्हणाले स्मारकासाठी पुतळ्याचा भार मी उचलला असला तरी स्मारक निर्मितीनंतर त्याची देखभाल आणि सौंदर्यीकरण कायम राखण्यासाठी नागरिकांनी स्वयंपे्ररणेने पुढे आले पाहिजे. कार्यक्रमात सेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर यांनी समितीच्या विविध उपक्रमाचे ध्येय पुर्तीचा उद्देश सांगून गत पाच वर्षापासून शहरात साजरी होत असलेली सावरकर जयंतीचाच परिणाम आज सावरकर स्मारक निर्मितीच्या वाटचालीत होत आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम देशपांडे यांनी केले तर आभार मदन परसोडकर यांनी मानले. कार्यक्रमाला माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. प्रसाद देशमुख, रामदास ढोणे, अटल पांडे, अविनाश देव, सरपंच अजय गांडोळे, सुवर्णा काळे, अशोक कठाणे, गौरी टिबडीवाल, श्रेया देशमुख, निलेश किटे, वंदना भुते, जयंत सालोडकर उपस्थित होते.