अडचणींची जाणीव; शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:49 PM2019-01-27T23:49:20+5:302019-01-27T23:51:08+5:30
यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे शासनाने राज्यात १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला असून दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वर्धा जिल्हयातही तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असून या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि जनावरासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाच्यावतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे शासनाने राज्यात १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला असून दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वर्धा जिल्हयातही तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असून या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि जनावरासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाच्यावतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव शासनाला असून शासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचे मुख्य ध्वजारोहण ना. महेता यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात आले. यावेळी संबोधित करताना ते बोलत होते. या सोहळ्याला आमदार डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, अपर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकाश महेता यांनी परेड निरिक्षण करुन सर्व स्वातंत्र संग्राम सैनिक आणि शहिदांना विनम्र अभिवादन करुन उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी., स्काऊट, गाईड पथकांनी पथसंचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच सामान्य रुग्णालयातर्फे प्रधानमंत्री मातृत्व योजनेवर उत्कृष्ट झाकी, आपात कालीन वैद्यकीय सेवा, पोलीस विभागाचे श्वान पथक, दंगल नियंत्रण व वज्रवाहन पथक, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचा चित्ररथाव्दारे जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन अतुल राजपायले यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
गुणवंतांचा झाला गौरव
उत्कृष्ट पथसंचलनाचा पुरस्कार एन.सी.सी. कॅडेट देवळी, जे.बी. सायन्स कॉलेज आणि महिला पोलीस पथकाला देण्यात आला. चित्ररथामध्ये पोलीस श्वान पथक, स्वच्छतेचा संदेश देणारा नगर परिषद विभाग व वृक्ष लागवडीचा संदेश देणारे सायकल स्वार अडसूळ यांना ना. महेता यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सांस्कृतिक सादरीकरणामध्ये पिपरी येथील अग्रगामी शाळा, गो.से. वाणिज्य महाविद्यालय व न्यू इंग्लिश शाळेच्या चमूला पुरस्कार दिला. जिल्हास्तरीय लघू उद्योजक पुरस्कार हिंगणघाट येथील गोलछा बायोसायन्स प्रा.लि. आणि कलोडे अग्रो. इंडस्ट्रिज, देवळी यांना देण्यात आला. तर भारत स्काऊट गाईड चळवळी अंतर्गत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गाईड व हिरकापंख प्राप्त बुलबुल यांना मंत्री महोदयाच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच केरळ राज्यात पूर परिस्थतीमध्ये उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिलेल्या वैद्यकीय चमूलाही सन्मानित केले.
क्रिडा क्षेत्रात संघटक, प्राविण्य प्राप्त खेळाडूंसह माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना मुदती ठेव प्रमाणपत्र, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र, संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना रोख पारितोषिक, पोलिस उपअधिक्षक अभय वानखेडे यांना विशेष सेवा पदक तसेच निखिल शेंडगे यांना दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले.