सुरक्षित मातृत्व आणि स्तन कर्करोबाबत जागृती
By admin | Published: March 17, 2017 02:06 AM2017-03-17T02:06:11+5:302017-03-17T02:06:11+5:30
महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सरोजिनी नायडू हॉल येथे स्तन कॅन्सर दिवसाबद्दल अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेस, कस्तुरबा ब्रेस्ट कॅन्सर क्लब
कस्तुरबा रूग्णालयाचा उपक्रम : महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत कार्यक्रम
वर्धा : महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सरोजिनी नायडू हॉल येथे स्तन कॅन्सर दिवसाबद्दल अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेस, कस्तुरबा ब्रेस्ट कॅन्सर क्लब, कर्करोग विभाग व संजिवनी लाईन बियॉन्डद्वारे जागृती कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सुरक्षित मातृत्व व स्तन कर्करोगाबाबत जनजागृतीपर माहिती देण्यात आली.
महात्मा गांधी आयुुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. पातोंड यांनी स्वागत भाषण केले. मुख्य आयोजक डॉ. विरेंद्र व्यास यांनी काव्यात्मक शैलीमध्ये स्तन कॅन्सर दिवसाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. यानंतर प्रमुख संजिवनी लाईफ बियॉन्ड कॅन्सर मुंबईच्या रूबी अहलुवालिया यांनी उपस्थित कॅन्सर रुग्णांचा आत्मविश्वास वाढविला. टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबईच्या वरिष्ठ स्तन कॅन्सर सर्जन प्रा.डॉ. वाणी परमार यांनी सेवाग्राम मेडिकल कॉलेज व बापू कुटी पाहून आनंद व्यक्त केला. नंदिनी मेहता यांनी महिलांच्या स्थितीवर विनोदी व भावपूर्ण शैलीत कविता सादर केली. यामुळे संपूर्ण सभागृह हर्षोल्हासित झाले होते. कस्तुरबा आरोग्य मंडळाचे सचिव डॉ. बी.एस. गर्ग यांनी महिलांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकत सुरक्षित मातृत्वाबाबत मार्गदर्शन केले.
कस्तुरबा आरोग्य मंडळाचे अध्यक्ष धीरूभाई मेहता यांनी महिलांवरील वाढते अत्याचार, जसे हुंडा, बलात्कार, स्त्री-भ्रूणहत्या व घरगुती हिंंसेची निंदा करीत क्षोभ व्यक्त केला. स्तन कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त करीत त्याबाबत जागरुकता वाढविण्याचे आवाहन केले. सोबतच कॅन्सर उपचाराचे आधुनिक तंत्रज्ञान जे कस्तुरबा रुग्णालयातील कर्करोग विभागात उपलब्ध आहे, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
डॉ. परमार यांनी स्तन कॅन्सरच्या विकसित शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली. यात स्तन पूर्णपणे न काढता त्याचा फक्त आजारग्रस्त भाग काढून उर्वरित स्तन वाचविता येऊ शकतो. ओन्कोप्लास्टी शस्त्रक्रियेद्वारे नवीन स्तन बनविण्याची यंत्रणा विकसित झाली असल्याचे सांगितले. या यंत्रणेचा वापर देशातील अनेक रुग्णालयांत होत आहे. टाटा रुग्णालयातील कीमोथेरपी प्रा.डॉ. ज्योती बाजपेयी यांनी विकसित कीमोथेरपीची माहिती दिली. किमोथेरपीमुळे डोक्याचे केस जाऊ नये यासाठी नवीन मशिनचे निर्माण झाले असल्याचे सांगितले.
अहमदाबाद येथील वी-किरण विशेषज्ञ डॉ. जिग्ना भट्टाचार्य यांनी नवीनतम वी-किरण यंत्रणेबाबत माहिती दिली. रुग्णांचा उत्तम उपचार करण्यासाठी विकसित झालेले नवीन तंत्र व त्याचे फायदे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कॅन्सरचा उपचार उत्तम प्रकारे करता येऊ शकतो, असे सांगितले.
यानंतर स्तन कॅन्सरग्रस्तांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. स्तन कॅन्सरबाबत जागरुकतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यात डॉ. परमार, डॉ. बाजपेयी, डॉ. भट्टाचार्य, डॉ. व्यास, डॉ. पंकज चौधरी, रूबी अहलुवालिया, डॉ. गुप्ता यांनी कर्करुग्णांचा उत्साह वाढविला. तत्पूर्वी मान्यवरांचे स्वागत पारंपरिक सुतगुंडी देऊन करण्यात आले. डॉ. सुमन पांडे, डॉ. दीपिका व नीतू यांनी स्वागत गीत सादर केले.
संचालन डॉ. रूची कोठारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. दीपिका यांनी मानले. याप्रसंगी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील प्राध्यापक, डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेले रुग्ण प्रामुख्याने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)