अस्वलाच्या भीतीने पांढुर्णावासी रात्रभर जागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:30 PM2017-08-21T23:30:13+5:302017-08-21T23:30:47+5:30
तालुक्यात ११ शेतकºयांवर हल्ले करून जंगलात दडून बसलेली अस्वल रविवारी पांढुर्णा गावजवळील शेतात पोहचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तालुक्यात ११ शेतकºयांवर हल्ले करून जंगलात दडून बसलेली अस्वल रविवारी पांढुर्णा गावजवळील शेतात पोहचली. अस्वलीला गावकºयांनी रिंंगण घातल्याने ती झाडावर चढली. झाडाजवळ गर्दी झाल्याने ती खाली उतरलीच नाही. यामुळे भीतीपोटी संपूर्ण गावकरी रात्रभर जागे राहिले.
याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाºयांना देण्यात आली. त्यांनी वनरक्षकांसोबत घटनास्थळ गाठत रात्रभर गस्त दिली. अस्वल हल्ला करेल अशी भीती प्रत्येक गावकºयांच्या तोंडी होती. पहाटे पाच वाजता गावकरी घरी येताच अस्वल झाडावरून उतरून पुन्हा जंगलात गेली. अस्वलाच्या हल्ल्यांमुळे समुहाने शेतात जाण्याशिवाय शेतकºयांना पर्याय नाही. अशातच रविवारी पुन्हा हे अस्वल सुधाकर भलावी यांना दिसले. भलावी श्वापदांपासून पिकांच्या रक्षणाकरिता शेतात गेले होते. अस्वल पाहताच घाबरलेल्या अवस्थेत सुधाकर यांनी गाव गाठत माहिती दिली. लाठ्या घेवून गावकरी शेतात गेले. गावकरी येताच अस्वलीने झाडावर बस्तान मांडले. याची माहिती संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तु परतेती, उपसरपंच गजेंद्र मडावी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांना दिली. त्यांनी वनरक्षक कोरडे, ढाले, जायभाये यांना सोबत घेवून घटनास्थळ गाठले. गावकरी संतप्त झाल्याने व अस्वल हल्ला करेल या भीतीने कुणीही झोपले नाही. गत दीड महिन्यापासून अस्वल जंगलात दडून बसल्याने शेतकरी काहीसे समाधानी होते; मात्र आता पुन्हा दहशत निर्माण झाली आहे.
अस्वल गावाशेजारी शेतात आल्याची माहिती मिळताच रात्रभर गस्त केली. मारण्याची परवानगी देणे शक्यच नाही. गावकºयांना पूर्ण संरक्षण देवू अस्वल पकडण्यासाठी पिंजरे लावले आहे. मात्र ती मोठ्या हुशारीने हल्ले करते. यासाठी उपाययोजना सुरूच आहे.
- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्रअधिकारी, आष्टी(श.)
अस्वल शेतात येवून झाडावर चढली. आम्ही झाड तोडून अस्वलीला मारणार होतो. मात्र वनविभागाने बंदोबस्त लावल्याने मारता आले नाही. आतापरी मोई, माणिकवाडा, किन्ही, बोरखेडी मिळून ११ हल्ले झाले आहे. अस्वल सापडेपर्यंत भीती कायम आहे.
- गजेंद्र मडावी, उपसरपंच