अतिधोकादायक वृक्षांच्या आड शतायुषींवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 05:00 AM2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:06+5:30
कंत्राटदाराला एका झाडाच्या फांद्या किंवा झाडं तोडण्याकरिता पालिकेकडून ९५० रुपये दिले जाते. कंत्राटदाराने अतिधोकादायक नसलेल्या झाडांनाही बोडखे करुन पालिकेकडून देयक उचलले तसेच ती लाकडेही विकल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील विविध भागातील वृक्ष किंवा फांद्या तोडण्याकरिता पालिकेचा आदेश नसतानाही अनेक महत्वाची झाडे तोडल्याचे निदर्शनास आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील नगरपालिका हद्दीतील अतिधोकादायक झाडे तोडणे, फांद्या तोडणे व पालापाचोळा साफ करुन विल्हेवाट लावण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. पण, कंत्राटदाराने पालिकेच्या कराराप्रमाणे कामकाज न करता मनमर्जी वृक्ष व फांद्या तोडण्याचा सपाटा लावला. तोडलेली लाकडे थेट विकल्या जात असल्याने आवश्यक नसलेल्या झाडांवरही कुऱ्हाड चालविली आहे. त्यामुळे शहरातील पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून यातील अर्थकारणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कंत्राटदाराला पालिकेने करारनामा करुन देतांना १९ अटी घालून दिल्या आहेत. मात्र, या कंत्राटदाराने पालिकेला विचारात न घेता तब्बल ९ अटींचा भंग केल्याचे माहितीतून उघड झाले आहे. यामध्ये झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर जागा साफ न करणे, अभियंत्याकडून ले-आऊट न घेणे, काम सुरु करण्यापूर्वीचे व नंतरचे फोटो न घेणे, कामावरील कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरणे, मजूर व कर्मचाऱ्यांचा विमा न काढणे यासह विद्यूत वितरण, वनविभाग, पोलीस आदी यंत्रणेची मदत न घेणे आणि नागरिक व नगरसेवकांचे प्रमाणपत्र न घेणे आदी अनियमितता आहे. कंत्राटदाराला एका झाडाच्या फांद्या किंवा झाडं तोडण्याकरिता पालिकेकडून ९५० रुपये दिले जाते. कंत्राटदाराने अतिधोकादायक नसलेल्या झाडांनाही बोडखे करुन पालिकेकडून देयक उचलले तसेच ती लाकडेही विकल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील विविध भागातील वृक्ष किंवा फांद्या तोडण्याकरिता पालिकेचा आदेश नसतानाही अनेक महत्वाची झाडे तोडल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी तक्रारही करण्यात आली तसेच कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली पण, उत्तर मिळत नसल्याने पाणी कुठे मुरतेय, याकडे लक्ष लागले आहे. विकासाच्या नावाखाली वर्धा शहरासह जिल्ह्यात वृक्षकत्तल केली जात असल्याचे बघावयास मिळत आहे.
झाडे नसतानाही म्हणे, फांद्या तोडल्या!
कंत्राटदाराला फक्त अतिधोकादायक झाडं व त्याच्या फांद्या तोडण्याचा कंत्राट दिला आहे पण, त्यांनी शहरातील बालोद्यान, मोकळी जागा तसेच मंदिर परिसरात असलेली पर्यावरणपूरक झाडेही स्वस्वार्थाकरिता तोडली आहे. इतकेच काय ज्या ठिकाणी झाडंच अस्तित्वात नाही, त्या झाडाच्या फांद्या तोडल्याबाबत देयक उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कंत्राटदाराने शहरातील महत्त्वाची झाडे तोडून अनधिकृतपणे लाखो रुपयांचे लाकूड विकल्याचा आरोप होत आहे.
शहरातील अतिधोकादायक वृक्षांच्या नावावर इतरही झाडे मोठ्या प्रमाणात तोडली आहे. पालिकेचा कोणताही आदेश नसताना मोठमोठी झाडे बोडखी केली आहे. मंदिर परिसर आणि बालोद्यानातील झाडांवरही कुऱ्हाड चालविली. लोभापोटी शहराच्या पर्यावरणाला धोका निर्माण केला आहे. त्यामुळे कंत्राट रद्द करुन कंत्राटदाराविरुद्ध वनकायद्यांतर्गत तसेच फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करावा.
- जयंत सालोडकर, स्वीकृत सदस्य, नगरपालिका वर्धा.