अंतर्गर्भाशयातील उत्पत्तीजन्य बालरोगांचे आयुर्वेदोपचाराने रक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:19 AM2017-08-07T00:19:24+5:302017-08-07T00:19:47+5:30
आयुर्वेद उपचाराने अंतर्गर्भाशयातील उत्पत्तीजन्य बालरोगांचे रक्षण करणे शक्य आहे, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. आेंकार कुळकर्णी (मुंबई) यांनी मांडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आयुर्वेद उपचाराने अंतर्गर्भाशयातील उत्पत्तीजन्य बालरोगांचे रक्षण करणे शक्य आहे, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. आेंकार कुळकर्णी (मुंबई) यांनी मांडले. सालोड हिरापूर येथे आयुर्वेद या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे संचालित महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान केंद्रातील स्त्री व बालरोग विभागाच्यावतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनपर कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. व्ही. के. देशपांडे, आयुर्वेद महाविद्यालयाचे समन्वयक व्ही. आर. मेघे, अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रिती देसाई, डॉ. के. एस. आर. प्रसाद, डॉ. रेणू राठी, डॉ. प्रतीक्षा राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. परिसंवादात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मंदार रानडे (पुणे) यांनी ‘गर्भाची परिचर्या व इपिजनेटिक्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. ओंकार कुळकर्णी यांनी ‘अंतर्गर्भाशयीन उत्पत्तीजन्य बालरोग’ यावर मार्गदर्शन केले. परिसंवादात एकूण १३ शोधनिबंध व ४ पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले. उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरणासाठी तीन पारितोषिक देण्यात आली. संचालन डॉ. तृप्ती ठाकरे यांनी तर आभार डॉ. राठोड यांनी मानले.