बच्चू कडूंची अशीही धुलवड अन् रंगपंचमी; ZP शाळेत जाऊन केली रंगरंगोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 04:32 PM2023-03-07T16:32:34+5:302023-03-07T17:05:19+5:30
होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला मित्र एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजर करत असतात
अमरावती/मुंबई - शिंदे गटाचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्याकडे सर्वसामान्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन आजही वेगळाच आहे. आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांचं काम मोलाचं आहे. तर, सातत्याने आरोग्यासंबंधी आणि समाजहित लक्षात घेऊन त्यांचं कार्य सुरू असते. आता, होळी व रंगपंचमीनिमित्त त्यांच्या प्रहार संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी महत्वाचं आवाहन केलंय. रंगपंचमीनिमित्त केवळ रंग न खेळता, गावातील झाडं, गावच्या भींती आणि गावच्या शाळा रंगवण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलाय. त्या उपक्रमाची सुरुवातही त्यांनी आजपासून केली.
होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला मित्र एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजर करत असतात. मात्र, आमदार बच्चू कडू यांनी याच धुलिवंदन दिनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. कडू यांनी आईंच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील वर्षीपासून शाळेच्या रंगोटीचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचं यावर्षीचा दुसरे वर्ष आहे, त्या निमित्ताने आमदार कडू यांनी आज कुरळपूर्णा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन स्वतः रंगरंगोटी केली. आमदार कडू यांच्या उपक्रमाच सर्वत्र कौतुक होत आहे. पुढल्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखांना एक शाळा रंगवण्याचे काम पूर्णत्वास नेण्याकडे प्रयत्नशील राहणार असल्याचे कडू यांनी यावेळी बोलताना म्हटले.
गतवर्षी माझ्या आईचं निधन झालं होतं, घरात दुखवटा होता आणि त्याच काळात रंगपंचमी आली होती. त्यामुळे, रंगमंपचीला आम्ही कुणीही रंग लावला नाही, रंगपंचमीचा उत्सव साजरा केला नाही. त्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत गाव रंगवलं, झाडं रंगवली, शाळा रंगवल्या. त्यातूनची ही संकल्पना आमच्या डोक्यात आली. त्या संकल्पनेला आता याही वर्षी आकार देण्याचं काम आम्ही करतोय. रंगपंचमी हा सण शाळा रंगवून, गाव रंगवून साजरा करण्याचा आमचा हा मानस यापुढेही वृद्धींगत होईल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.