आर्वी वन विभाग वाघाच्या मागावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:32 PM2018-10-24T23:32:19+5:302018-10-24T23:32:57+5:30
नरभक्षक वाघास पकडण्यास गेल्यांना मागील सहा दिवसांपासून यश आलेले नाही. सदर वाघाचा धुमाकूळ आर्वी तालुक्यापासून दक्षिण दिशेला १६ किमी दूर सुरू असून त्याच्या मागावर आर्वी वन विभागाच्या दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : नरभक्षक वाघास पकडण्यास गेल्यांना मागील सहा दिवसांपासून यश आलेले नाही. सदर वाघाचा धुमाकूळ आर्वी तालुक्यापासून दक्षिण दिशेला १६ किमी दूर सुरू असून त्याच्या मागावर आर्वी वन विभागाच्या दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. असे असले तरी वाघाबाबत परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत आहे.
वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे शेतीची विविध कामे ठप्प पडली आहेत. आर्वी वन विभागाच्या दोन चमू वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रवाना करण्यात आल्या आहेत. परंतु, त्याचा खात्रिदायक ठावठिकाणा या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. सदर वाघ वर्धा जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा असून वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आर्वी वन विभागाची १६ कर्मचाºयांची दोन चमू तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प परिसरात डोळ्यात तेल टाकून सध्या खडा पहारा देत आहे. इतकेच नव्हे तर ग्रा.पं., महसुल, पोलीस विभाग यांचेही त्याकडे लक्ष असून त्यांच्याकडूनही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सदर वाघास पिंजराबंद करण्याची मागणी शेतकºयांसह दहशतीखाली असलेल्या परिसरातील ग्रामस्थांची आहे.
सोशल मिडियावरील चित्रफित बनावट
बुधवारी सकाळपासून आर्वी तालुक्यातील नागरिकांच्या मोबाईलमध्ये व्हॉटस् अॅप द्वारे वाघाबाबतची एक चित्रफित अनेक ग्रुपवर फिरत होती. या चित्रफित बाबत वन विभागाचे अधिकारी टुडे यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणली असता त्यांनी ती बनावटी असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता दक्ष राहण्याचे आवाहनही केले आहे.
मांडव्यात वाघाचा बैलावर हल्ला
आकोली : वर्धा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या मांडवा येथील विकास विद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या चिकराम यांच्या शेतात असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. यावेळी शेतातील नागरिकांनी आरडा-ओरड केल्याने वाघाने तेथून पळ काढला. सदर घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली असून वन विभागाने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. मांडवा येथील विकास विद्यालय हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. शिवाय ते गावालगत आहे. याच भागातील चिकराम यांच्या शेतात चरत असलेल्या बैलावर अचानक नाल्याच्या दिशेकडून आलेल्या वाघाने हल्ला केला. ही बाब निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी आरडा-ओरड केली. यामुळे घटनास्थळावरून पळ काढून वाघाने नाल्या लगतच्या झुडपात आश्रय घेतला. सदरची माहिती वन विभागाच्या अधिकाºयांना मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठून परिसराची बारकाईने पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.