कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नकार्य अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:19 PM2020-03-17T14:19:16+5:302020-03-17T14:21:24+5:30
जगासह देशात व राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्च व एप्रिल महिन्यात होणारे लग्न समारंभ अडचणीत आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जगासह देशात व राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्च व एप्रिल महिन्यात होणारे लग्न समारंभ अडचणीत आले आहे. त्यामुळे वधू व वर पित्याच्या अडचणी वाढल्या आहे. मंगल कार्यालय, कॅटरर्स व इतर कामासाठी आगावू स्वरूपात दिलेली रक्कम परत कशी मिळवायची याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. मार्च महिन्या साधारणत: २९ व ३० मार्च या दिवशी लग्नांचा मोठा ठोक आहे. यासाठी सहा ते आठ महिन्यापूर्वीच मंगल कार्यालय, कॅटरर्स, लग्नबस्ते बूक करण्याचे व खरेदीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मार्च महिन्यात राज्यात कोरोना आजाराने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. राज्यात एक बळी या आजाराने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केले आहे.
गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा स्थितीत लग्नकार्य मार्गी लावणे कठीण होणार आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे, असे अनेकजण विचारात पडले आहेत. तर काहींनी लग्न समारंभ, स्वागत समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सेलू येथील दफ्तरी परिवारातील स्वागत समारंभ याच पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती कुटूंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी तेरवी कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील कोरोना आजाराची स्थिती कशी राहते यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून राहणार असून लग्न कार्य रद्द केले जात असल्याने यावर अवलंबून असणारे इतर अनेक व्यवसायही अडचणीत आले आहे. कॅटरर्स व्यवसायाला याचा फटका बसला असून वधू व वर पित्याचा लागलेला खर्च या पार्श्वभूमीवर पाण्यात जाणार आहे.
सार्वजनिक मिरवणूका, आंदोलनांवरही बंदी
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मिरवणूका व सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लग्न समारंभात वरातीच्या मिरवणूका मोठ्या प्रमाणावर काढल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न वरातीही काढण्यास अडचण येणार आहे.