बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमुळे शेतात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:22 AM2019-08-28T00:22:44+5:302019-08-28T00:23:09+5:30
सदर बंधारा हा वीस वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा पासून या शेतकऱ्याचे वडील निव्वळ अज्ञानामुळे नुकसान सहन करीत होते. मुलाने शेती हाती घेतल्यानंतर सात-बारा वर असलेले क्षेत्र उपलब्ध क्षेत्रामध्ये खुप मोठी तफावर दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : एम. आय. डी. सी. ला पाणीपुरवठा करण्यासाठी धाम नदीवर पवनारला बंधारा बांधलेला आहे. या बंधाऱ्याचे बॅक वाटरमुळे निंबाळकर या शेतकºयाच्या दोन एकर क्षेत्राला तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतात पाणीच पाणी असल्याने उभ्या पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.
सदर बंधारा हा वीस वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा पासून या शेतकऱ्याचे वडील निव्वळ अज्ञानामुळे नुकसान सहन करीत होते. मुलाने शेती हाती घेतल्यानंतर सात-बारा वर असलेले क्षेत्र उपलब्ध क्षेत्रामध्ये खुप मोठी तफावर दिसून आली. तेव्हा मोजणी केली असता जवळपास ३ एकर क्षेत्र कुठलाही मोबदला न देता आधीच घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या संदर्भात त्यांनी उपअभियंता म.औ.वि.म प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.म, नागपूर यांचेकडे वारंवार तक्रार दाखल केली. परंतु, विभागाने कुठलाही सर्व्हे केला नाही. शिवाय तक्रारीची साधी दखल घेतली नाही. त्या सोबतच उरलेल्या दोन एकर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक वॉटरने नुकसान होत आहे. बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच न उघडल्या जात असल्याने शेतकºयाचे नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीला विभागीय कार्यालयाकडे पाठविले आहे. सदर प्रश्न हा भूमिअभिलेखकडे येतो. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विभागीय कार्यालयामार्फत चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी मात्र सांगता येणार नाही.
- गोपाल सोनसरे, विभागीय व्यवस्थापक, एमआयडीसी, नागपूर.
आमची ही वडिलापार्जीत शेती आहे. वडिलांच्या काळापासून येथे नेहमीच नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. नुकसान टळावे या उद्देशाने संबंधितांना तक्रार करण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून उडवा-उडवीचे उत्तरे देऊन अडचणीत भर टाकली जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु, जिल्हाधिकारी योग्य न्याय करतील असा मला विश्वास आहे. कारण ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.
- सुनील निंबाळकर, शेतकरी.