तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था, जनावरांचा मुक्तसंचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 06:31 PM2024-10-18T18:31:54+5:302024-10-18T18:32:38+5:30
खेळाडूंसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती: मैदान खेळाडूंसाठी की गुराढोरांसाठी
राजेश सोळंकी
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : येथील तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली असून सध्या हे संकुल खेळाडू, नागरिकांसाठी की जनावरांकरिता? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या क्रीडा संकुलाच्या मैदानावर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह खेळाडूंना मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. ही जनावरे अंगावर चाल करून येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे तालुका क्रीडा संकुलाच्या प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आर्वी हे खेळाचे माहेरघर असून अनेक वर्षे इथे तालुका क्रीडा संकुल संपूर्ण झाले नव्हते. तत्कालीन तहसीलदार पवार आणि नायब तहसीलदार आनंद देवकते यांनी पुढाकार घेऊन हे मैदान विकसित कसे करता येईल, यावर लक्ष दिले होते. त्यामुळे खेळाडूंना फार मोठा दिलासा मिळाला होता.
आर्वी तालुक्यातील सर्व क्रीडा स्पर्धा, पावसाळी स्पर्धा या मैदानावर होतात. दररोज सकाळी आणि सायंकाळी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसह इतरही खेळाडू सरावासाठी येतात. यासह ज्येष्ठ नागरिकही फिरायला येतात. पण, सध्या दुरवस्था झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्वी तालुक्यात हे एकमेव क्रीडा संकुल आहे.
हे मैदान एका कार्यक्रमाकरिता देण्यात आले होते पण, कार्यक्रम आटोपल्यावर काहींनी या मैदानावर दारूच्या बाटल्या फोडल्याने काचा विरुखलेल्या आहेत. संरक्षण कुंपणाच्या तारा तोडल्या, ही बाब पहाटे मैदानावर गेलेल्या खेळाडू व ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने या मैदानावरील या काचा गोळा करायला सुरुवात केली
येथे व्यायामाच्या साहित्यांची आणि खेळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून काहीनी याची दुरवस्था केल्याने इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे 'लोकमत'जवळ सांगण्यात आले.
तुटलेल्या साहित्यांची दुरुस्ती करण्यात यावी...
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे या मैदानाचे निरीक्षण करून येथे तोडलेले कुंपण गेट पूर्ववत दुरुस्त करण्यासंबंधी कारवाई करावी. सकाळी व्यायामाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच फिरावयास येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण द्यावे. • मैदानामध्ये चांगल्या प्रकारचा ट्रैक उपलब्ध करून दिल्यास खेळाडू चांगल्या प्रकारे पुन्हा तयार होऊ शकतात. याचा विचार करून खेळाडूंना न्याय मिळवून देण्याची मागणी आर्वीकरांनी केली आहे.
तहसीलदार म्हणतात
"या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानाची काळजी घेण्याकरिता उपाययोजना केली जाणार आहे. आचारसंहिता संपल्यावर मैदानावरील कामे सुरू केली जाईल."
- हरीश काळे, तहसीलदार, आर्वी.
"या मैदानावर आम्ही सकाळी सेवानिवृत्त झालेले नागरिक फिरायला जातो. विद्यार्थीही तिथे व्यायामाला, फिरायला येतात. परंतु तिथे गुराढोरांचा मोठा वावर असल्याने ते अंगावर धावतात. एका कार्यक्रमाकरिता हे मैदान दिल्याने याची दुरवस्था करण्यात आली. याकडे तालुका क्रीडा संकुलनाचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांनी लक्ष द्यावे. त्यांनी कोणत्याही कार्यक्रमाकरिता हे मैदान देऊ नये."
- अशोक वानखडे, ज्येष्ठ नागरिक, आर्थी.