काळ्या फिल्मवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:08 AM2018-03-22T00:08:53+5:302018-03-22T00:08:53+5:30
चार चाकी वाहनांमध्ये अनैतिक कृत्ये, अत्याचार वाढले होते. ही बाब लक्षात घेत चार चाकी वाहनांच्या काचांना लावल्या जाणाऱ्या काळ्या फिल्मवर शासनाने बंदी घातली.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : चार चाकी वाहनांमध्ये अनैतिक कृत्ये, अत्याचार वाढले होते. ही बाब लक्षात घेत चार चाकी वाहनांच्या काचांना लावल्या जाणाऱ्या काळ्या फिल्मवर शासनाने बंदी घातली. असे असले तरी अनेक वाहनधारक काचांना काळ्या फिल्म लावतात. यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून वारंवार कारवाई केली जाते. आता पुन्हा वाहनांवरील काळ्या फिल्मविरूद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
चार चाकी वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक दहा घरांमागे दोन-तीन चार चाकी वाहने दिसून येतात. उन्हाळ्यामध्ये काचांतून थेट उन्हाची किरणे येऊ नयेत, वाहन अधिक उष्ण होऊ नये म्हणून काचांना काळ्या काचा लावल्या जातात. हा उद्देश चांगला असला तरी काळ्या काचांच्या आड काही असामाजिक तत्व अनैतिक कृत्य करीत असल्याचे समोर आले होते. अशा अनेक घटना देशात समोर आल्या. यामुळे शासनाने वाहनांच्या काचांना लावल्या जाणाºया काळ्या फिल्मवर बंदी आणली; पण ती न जुमानता अनेक कारधारक काळ्या फिल्म लावत असल्याचे दिसून येते. शिवाय प्रत्येक ट्रॅव्हल्सच्या काचावरही काळ्या फिल्म दिसून येतात. यातून शासनाच्या आदेशाची अवहेलना होत असल्याचेच दिसते.
काळ्या फिल्मची बंदी अंमलात यावी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून वारंवार मोहीम राबविण्यात येते. सहा महिन्यांपूर्वीही जिल्ह्यात आरटीओकडून काळ्या फिल्मविरूद्ध मोहीम राबविण्यात आली होती. यात वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा आरटीओ कार्यालयाकडून मोहीम हाती घेण्यात येत आहे. गुरूवारपासून जिल्ह्यात वायूवेग पथकाद्वारे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यात चार चाकी वाहनांच्या काचावर काळी फिल्म आढळल्यास २०० रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. वाहन धारकांनी स्वत: काचांवरील काळ्या फिल्म काढाव्या, असे आवाहनही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.
काळ्या फिल्मला पूर्णत: बंदी
काही वाहन धारक १० ते १५ टक्के ब्लॅक फिल्म लावण्यास परवानगी असल्याचे सांगतात; पण आरटीओ विभागाकडून त्यास नकार देण्यात आलेला आहे. वाहनामध्ये बसलेली व्यक्ती बाहेरून दिसली पाहिजे, असे आरटीओकडून सांगण्यात येते. कुठल्याही स्थितीत वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म नकोच, असा नियम आहे. यामुळे वाहन धारकांनी वाहनांना काळ्या काचा लावू नये, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
नेते, अधिकाऱ्यांची वाहनेही सदोषच
जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेत्यांकडील वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म आढळून येतात. काही अधिकाऱ्यांच्या वाहनांनाही काळ्या फिल्म लागलेल्या दिसतात. यामुळे ती वाहनेही आरटीओच्या नियमाप्रमाणे सदोषच ठरतात. सदर वाहनांचीही तपासणी गरजेची झाली आहे.
चार चाकी वाहनांवरील काळ्या फिल्मला शासनाने बंदी घातलेली आहे. त्यानुसार वाहनातील व्यक्ती बाहेरून दिसणे गरजेचे आहे. कुठल्याही स्थितीत वाहनांना काळ्या फिल्म नकोत. यामुळे वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांवरील काळ्या फिल्म काढून घ्याव्यात. याविरूद्ध गुरूवारपासून मोहीम राबविण्यात येणार आहे.
- विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.