वर्धेत मोर्चातून बहुजनांचा हुंकार
By admin | Published: January 6, 2017 01:18 AM2017-01-06T01:18:01+5:302017-01-06T01:18:01+5:30
कुण्या एका मागणीकरिता एक समाज रस्त्यावर येवून मोर्चा काढतो. यात मागणी पूर्ण होत नाही, असे म्हणत
४३ मागण्यांकरिता एकवटल्या ४४ संघटना : शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग
वर्धा : कुण्या एका मागणीकरिता एक समाज रस्त्यावर येवून मोर्चा काढतो. यात मागणी पूर्ण होत नाही, असे म्हणत ‘एकच पर्व बहुजन सर्व’चा नारा देत जिल्ह्यातील सर्वच बहुजन संघटनांच्यावतीने वर्धेत गुरुवारी एका विशाल मोर्चातून आक्रोश नोंदविला. या मार्चातून तब्बल ४३ मागण्यांचे निवेदन मोर्चाच्या एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले व ते मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्याची विनंती केली.
या मोर्चात विविध मागण्यांसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी, मराठा-कुणबी, एनटी, एसबीसी व अल्पसंख्याक मुस्लीम, ख्रिश्चन, शिख, बौध्द, जैन, लिंगायत या सर्व बांधवांचा समावेश होता. मोर्चा निघण्याचे नियोजित स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान होते. यामुळे येथे सकाळी ११ वाजतापासूनच मोर्चेकरांची गर्दी उसळली होती. येथे एकत्र आलेल्या बहुजन समाजाला जिल्ह्यातील काही बहुजन नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एका मागणीकरिता एकत्र येण्याऐवजी सर्वच समाजाच्या मागण्यांकरिता एकत्र येण्याची वर्धेतील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले. हा मोर्चा कोणाच्या विरोधात नसल्याने या मैदानावर बहुजन समाज एकत्र आला होता. बहुजनांची उपस्थिती झाल्यानंतर दुपारी ३ वाजता हा मोर्चा ठरलेल्या मार्गाने रवाना झाला.
अॅट्रोसिटीचा कायदा अधिक कडक करा, मुस्लीम समाजाला सच्चर कमिशन लागू करा, महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायदा कडून करून कोपर्डी आणि त्यापूर्वी व त्यानंतरच्या तत्सम घटनांमधील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच एनटी, डीएनटी, व्हिजेएनटी यांना अॅट्रासिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे. राज्यातील १२ बलुतेदार समाजाच्या हक्काची अंमलबजावणी करून त्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तयार करावे, यासह अनेक मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा मुख्य डाकघर, शिवाजी चौकात पोहाचला. येथे मोर्चातील काही युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. या पुतळ्याला वेढा देत मुख्य मार्गाने बजाच चौकात पोहोचला. येथे विविध मागण्यांकरिता घोषणा देण्यात आल्या.
येथून शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे रवाना झाला. रस्त्याने महापुरूषांचा जयजयकार करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ पोहोचलेला मोर्चा विसर्जित झाला. तत्पूर्वी एका शिष्टमंडळाने या मोर्चादरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.(प्रतिनिधी)
महापुरूषांच्या वेशभूषेतील युवक ठरले आकर्षण
४या मोर्चात काही युवकांनी महापुरूषांच्या वेशभूषा केल्या होत्या. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा यासह गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेचा समावेश होता. या वेशभूषेतील युवक मोर्चाच्या प्रारंभी होते. चौकाचौकात त्यांच्या तोंडून घोषणा निघताच मोर्चात सहभागी युवकही घोषणा देत होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
४वर्धा शहरातून निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणाऱ्यांची व सर्वसामान्यांची गैरसोय होवू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा ज्या मार्गे जाणार होता त्या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात आली होती. मात्र मोर्चाला विलंब असल्याने त्या मार्गे होत असलेली वाहतूक कायम ठेवण्यात आली होती. मोर्चा निघताच या मार्गांवरील वाहतूक त्या काळाकरिता रोखण्यात आली होती. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.