बहुजन समाज क्रांती मोर्चाची पालिकेवर धडक
By Admin | Published: June 18, 2017 12:39 AM2017-06-18T00:39:42+5:302017-06-18T00:39:42+5:30
इंदिरा वसाहतीतील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क देण्यात यावा यासह अन्य
नगराध्यक्षांना निवेदन : समस्यांच्या निराकरणाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : इंदिरा वसाहतीतील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क देण्यात यावा यासह अन्य मागण्यांकरिता बहुजन समाज क्रांती मोर्चा आयोजन समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील, नगर परिषद कार्यालयावर धडकला. नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती सुनीता बकाणे व सुनीता ताडाम यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले.
जाती विरहित समाजव्यवस्था निर्माण करून महापुरूषांचे कार्य पूढे नेण्यासोबतच अन्याय अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा असल्याचे सांगण्यात आले. मोर्चाद्वारे इंदिरा वसाहतीतील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क देण्यात यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व वाचनालयाचे काम पूर्ण करण्यात यावे. शहीद अशोक गेडाम स्मारकाचे काम त्वरित करण्यात यावे, क्रांतीविर बिरसा मुंडा सभागृहाचे काम नियोजित जागेवर करण्यात यावे, दलित वस्तीतील खोटे ते बोडेकर यांच्या घरापर्यंतच्या नाल्याचे बांधकाम करण्यात यावे. नगर परिषदेच्यावतीने चार ते पाच दिवसांआड करण्यात येणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. दलित वस्ती वॉर्ड क्र. ४ मधील कांजी हाऊसचे जीर्ण झालेले बांधकाम पाहून त्या ठिकाणी डॉ. आंबेडकर ज्ञान मंदिरचे बांधकाम व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. बसस्थानकावर शौचालयाचे बांधकाम व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. न.प. परिसरातील अर्धवट नाली व रस्त्याची कामे, रस्ता दुभाजक व बंद पडलेले हायमास्ट सुरू करण्यात यावे आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. मोर्चामध्ये न.प. सदस्य गौतम पोपटकर, दादा मून, मोहन गणवीर, आकाश खंडाते, हबीब गादीवाला यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
मोर्चाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाने सामान्यांच्या समस्या गांभीर्याने घेत शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, हा संदेश दिला जात असल्याचेच दिसून आले.