बालाजी रथोत्सवाला १५१ वर्षांची परंपरा
By admin | Published: October 5, 2014 11:10 PM2014-10-05T23:10:15+5:302014-10-05T23:10:15+5:30
सुमारे १५१ वर्षांची परंपरा असलेला येथील श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव यात्रा महोत्सव उद्या सोमवारी साजरा होत आहे. या निमित्त गावात भरत असलेल्या यात्रेकरिता भाविकांची गर्दी वाढत आहे.
गौरव देशमुख - वायगाव (निपाणी)
सुमारे १५१ वर्षांची परंपरा असलेला येथील श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव यात्रा महोत्सव उद्या सोमवारी साजरा होत आहे. या निमित्त गावात भरत असलेल्या यात्रेकरिता भाविकांची गर्दी वाढत आहे. या गर्दीला शनिवारपासूनच प्रारंभ झाला आहे.
वाढती लोकसंख्या व गावाचा झालेला विकास यामुळे मोठा रथ गावातून फिरविणे कठीण जात असल्याने एकादशीच्या दिवशी गावातून लहान रथ फिरविण्यात येतो. या लहान रथाद्वारे शनिवारी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यांनतर त्रयोदशीला मोठ्या रथात श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांच्या मूर्तीची स्थापना करून तो गावातील मुख्य मार्गाने काढण्यात येतो. या रथयात्रेत भजन दिंडी, लेझिम, टीपऱ्या व ‘हरी नारायण गोविंदा’च्या जयघोषाने वायगाव नगरी दुमदमून जाते. हा रथ लोकांद्वारे ओढल्या जातो. या उत्सवाकरिता ट्रस्टचे अध्यक्ष सुनील तळवेकर, सल्लागार चंद्रकांत ठक्कर यांच्यासह सदस्य व गावकरी कार्यरत आहेत.
बालाजी भगवान हे वायगाव (नि.) सह जिल्ह्याचे श्रद्धास्थान झाले आहे. बालाजी भगवान रथोत्सव दिंडी सोबत टाळ-मृदंगाच्या गजरात वायगाव (नि.) मंदिरातून विधीवत पूजा करून सुरुवात होते. १८६३ मध्ये बालाजी भगवान रथयात्रा सुरू झाली ती आजपर्यंत परंपरागत पद्धतीने सुरू आहे. गावातून रथ फिरतो त्या दिवशी गावातील प्रत्येक अंगणात सडा टाकून रांगोळ्या काढण्यात येतात. रथोत्सवाला १५१ वर्षाची परंपरा असल्याने वर्धेसह आसपासच्या भागातील भाविक उत्सवात सहभागी होतात. येथील कपडालाईन, बाजार, बसस्टॉप चौक परिसरातील मिठाई, खेळणी, भांडींची दुकाने थाटली आहेत. रथ ओढण्यासाठी दरवर्षी होणारी गर्दी पाहता सर्वांनाच हा मान मिळाला पाहिजे म्हणून भाविकांनी शांततेत एकाच रांगेत उभे राहून रथ ओढावा, असे रथोत्सव समितीने कळविले आहे.