गिट्टी खदानीतील खड्ड्यांनी घेतला तिघींचा बळी
By admin | Published: July 25, 2016 01:50 AM2016-07-25T01:50:53+5:302016-07-25T01:50:53+5:30
गिट्टी खदानीत उत्खननामुळे निर्माण झालेल्या खड्डेरूपी तलावातील पाणी नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
वर्धा : गिट्टी खदानीत उत्खननामुळे निर्माण झालेल्या खड्डेरूपी तलावातील पाणी नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. देवळी तालुक्यातील आगरगाव येथील तीन मुलींचा या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघड झाली. यावेळी एका गावकऱ्याच्या प्रयत्नाने त्यांच्यासोबत असलेल्या तिघी थोडक्यात बचावल्या.
आगरगाव येथील सहा मुली या खदानीवर कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. यात खड्ड्यांतील पाण्यात पडून अंजली हिरणसिंग भोसले (१८), रोहिणी सुइंद्रसिंग चव्हाण (१६) व तोरणा नज्जुराव चव्हाण (१४) या तिघींचा मृत्यू झाला, तर दिक्षा प्रदीप पवार, वैशाली बंडुसिंग पवार व आशिकला नगीनराम पवार या तिघी थोडक्यात बचावल्या. या सहा जणी नित्याप्रमाणे गावालगत असलेल्या गिट्टी खदानीत उत्खननामुळे तयार झालेल्या तलावात साचलेल्या पाण्यात कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. कपडे धुताना रोहिणीचा पाय घसरून ती पडली. तिला वाचविण्यासाठी तोरणा आणि अंजलीसह इतर तिघीही पाण्यात उतरल्या; मात्र त्यांनीही गटांगळ्या घेतल्या. यावेळी रस्त्याने जात असलेल्या राजू सदाशिव मेंढेकार रा. आगरगाव याची या मुलींवर नजर पडली. त्याला त्या गटांगळ्या खात असल्याचे दिसताच त्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. सहापैकी तिघींना वाचविण्यात त्याला यश आले; मात्र तिघींचा यात बळी गेला.
गिट्टी खदानीत तयार होत असलेल्या या जीवघेण्या तलावांकरिता खदानीचे मालकच जबाबदार असल्याचे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले. गिट्टीचा उपसा झाल्यानंतर येथे तयार झालेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी मालकांची आहे; मात्र त्यांच्याकडून असे होत नाही. यामुळे असे मृत्यूचे सापळे एका देवळी तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यात निर्माण होत आहेत. वर्धेलगत बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), येळाकेळी येथील अशा तलावांत अनेकांचा बळी गेला आहे. याची शासन दरबारी नोंद असली तरी त्यांच्याकडून या खदान मालकांवर काहीच कार्यवाही होत नाही, याचेच नवल! मृत्यू झालेल्या तिघी येथे नित्यानेच येत होत्या. पावसाचे दिवस असल्याने या खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज चुकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. शिवाय तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी गावाला भेट देत प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठविल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)