केळी, डाळींबाला फटका
By admin | Published: May 12, 2017 12:50 AM2017-05-12T00:50:00+5:302017-05-12T00:50:00+5:30
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेले वादळाचे थैमान गुरुवारीही कायम होते.
तळेगाव व एकुर्लीला वादळाचा तडाखा : अनेक गावांतील बत्ती गुल
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/तळेगाव (टालाटुले) : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेले वादळाचे थैमान गुरुवारीही कायम होते. आर्वी मार्गावर मजरा व आंजी (मोठी) येथे झाडे तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. तर बुधवारी रात्री तळेगाव (टा.)^ व एकुर्ली परिसराला वादळाने चांगलेच झोडपले. या वादळासह गारपीट झाल्याने येथील केळी आणि डाळींब बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी झालेले गारपीट झाडांवरील पोपटांकरिता कर्दनकाळ ठरले. गारांच्या माऱ्यामुळे अनेक पोपटांचा मृत्यू झाला.
गुरुवारी सायंकाळी पुलगाव, आकोली परिसरात पाऊस आला. आर्वी मार्गावर झाडे तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. हा पुरवठा केव्हा सुरळीत होईल, याचा कुठलाही नेम नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
बुधवारी रात्री आलेल्या वादळामुळे तळेगाव व एकुर्ली येथे शेतकऱ्यांनी शेतात त्यांच्या जनावरांकरिता तयार केलेल्या गोठ्यांवरील टीनपत्रे उडून गेले. तर काही घरांवरील छताचे नुकसान झाले. यावेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. या वादळात विजेचे २० पोल जमीनदोस्त झाल्याने रात्रभर गावकऱ्यांना काळोखाचा सामना करावा लागला. वीज पुरवठा खंडीत झाल्याने गावातील पाणी पुरवठाही खोळंबला आहे. यामुळे गुरुवारी सकाळी गावकऱ्यांना पाण्याकरिता भटकावे लागले.
शासकीय अधिकाऱ्यांनी गावात येत नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी जोर धरत आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी जि.प. सदस्य विमल वरभे तसेच एकुर्लीचे सरपंच भास्कर वरभे व गावकऱ्यांनी केले आहे.