बँक कर्मचाऱ्यांची अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:02 PM2019-04-23T22:02:18+5:302019-04-23T22:02:39+5:30
एकेकाळी कारंजा शहरातील नावाजलेली आणि ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास अग्रेसर असणारी स्टेट बँक कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे, सेवा देण्यास टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांच्या नजरेतून उतरत चालली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : एकेकाळी कारंजा शहरातील नावाजलेली आणि ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास अग्रेसर असणारी स्टेट बँक कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे, सेवा देण्यास टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांच्या नजरेतून उतरत चालली आहे. अनेक ग्राहक या बँकेतील खाते बंद करण्याच्या निर्णयाप्रत आलेले आहेत.
स्टेट बँक आॅफ इंडिया कारंजातील सर्वांत जुनी व ग्राहकांची विश्वासपात्र बँक. मात्र या दोन वर्षांच्या काळात कर्मचाऱ्यांच्या अरेरावी व उद्धट वागणुकीमुळे व तत्पर सेवा देत नसल्यामुळे ग्राहकांना नकोशी झाली आहे. या बँकेतील पासबुक प्रिंटर मशीन सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पासबुकांत किती रक्कम जमा आहे, ते पाहता येत नाही. रक्कम काढताना अडचण होते. अकाऊंट स्टेटमेंट पाहण्यासाठी सुरू करण्यात आलेली एसएमएससेवा बंद करण्यात आली आहे. अकांऊटचे आयकरकरिता लागणारे जनरल मिनी स्टेटमेंट द्यायला कर्मचारी तयार नाहीत, ग्राहकांनी ई-मेल नंबर द्यावा म्हणजे स्टेटमेंट इमेलवर पाठविता येईल, नंतर त्याची ग्राहकांनी १५ ते २० रूपये खर्च करून प्रिंट काढावी, असे तुघलकी उपाय सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांजवळ ई-मेल आयडी नसतो. त्यांनी काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पैसे काढण्याची सोयीची असलेली टोकन पद्धती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना पैसे टाकणे किंवा काढण्यासाठी, स्वतंत्र खिडकी नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांना ३ ते ४ तास उभे राहावे लागल्यामुळे भोवळ येऊन खाली कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
प्रत्येक कर्मचाऱ्याचे बैठकीसमोर त्या कर्मचाऱ्याचे नाव आणि त्यांच्याकडे असलेल्या कामाचे स्वरूप दर्शविणारा सूचनाफलक नाही. एखाद्या ग्राहकाने कामाबद्दल विचारले असता तिकडे जा, असे सांगण्यात येते, ग्राहक चौफेर फिरतो; पण त्याचे काम व अडचण ऐकून घ्यायला कुणीही तयार नाही. रसोमवारी पंचायत समिती सदस्य टिकाराम घागरे आणि एक प्रतिष्ठित डॉक्टर खात्यात किती रक्कम आहे, हे विचारण्यासाठी बँकेत आले असता दोन तास फिरलेत; पण त्यांना कुणीही मदत केली नाही. शेवटी बँकेला शिव्याशाप देत ते परत गेलेत. सुशीक्षित माणसाचे हे हाल आणि अशिक्षित ग्रामीण ग्राहकांना तर या बँकेत विचित्र वागणूक देऊन हाकलून लावले जाते.
बँकेत ग्राहकांसाठी स्वतत्र स्वच्छतागृह नाही. याशिवाय पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे बाहेर भटकंती करावी लागते. उभे राहावे हे समजत नाही. इमारत अत्यंत तोडकी आहे. वाहन तळ नाही, त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी ठेवावी लागतात रस्ता बंद होतो. बँकेतील कर्मचाऱ्यांना सौजन्याचे धडे देण्याची गरज शहरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
जनआंदोलन उभारण्याची व्यक्त होतेय गरज
राष्ट्रीयीकृत बँका पब्लिक सेक्टरमध्ये येत असल्याने कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सौजन्याची वागणूक द्यायला पाहिजे, पण तसे घडत नाही. बँकांतील कर्मचारी आपले कुणीच काही बिघडवू शकत नाहीत या तोºयात दिसतात. जनआंदोलन उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.