पीक कर्ज कपातीकरिता बँकेने शेतकऱ्यांची खाती गोठविली
By admin | Published: December 28, 2016 01:06 AM2016-12-28T01:06:49+5:302016-12-28T01:06:49+5:30
येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेने पीक कर्जाची रक्कम थेट कपात करण्याकरिता शेतकऱ्यांची बँक खाती गोठविली आहे
शेतकरी आर्थिक संकटात : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागितली दाद
हिंगणघाट : येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेने पीक कर्जाची रक्कम थेट कपात करण्याकरिता शेतकऱ्यांची बँक खाती गोठविली आहे. बँकेच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या बचत खात्यात रक्कम असूनही ती त्यांना मिळणे कठीण झाले आहे. आधी कर्ज भरा नंतरच खाती सुरू करू, असे बँकेचे अधिकारी सांगत आहेत. या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांची भेट घेऊन बँकेच्या या अन्यायपूर्वक धोरणापासून दिलासा देण्याची मागणी केली आहे.
वेळा येथील शेतकरी पुंडलिक बोरकर आणि येरणगाव येथील शेतकरी वसंता मुडे यांनी बँकेतील आपल्या बचत खात्यात कापसाच्या चुकाऱ्याची रक्कम जमा केली. ते सोमवारी या खात्यातील पैसे काढण्याकरिता गेले असता त्यांना अधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. आपल्याकडे बँकेच्या पीक कर्जाची रक्कम थकीत असल्याने खाते गोठविले असल्याचे सांगण्यात आले. पुंडलिक बोरकर यांनी आठ क्विंटल कापूस बाजार समितीत विकला होता. यापोटी त्यांना ४० हजार रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. त्यांच्यावर बँकेचे ४९ हजार रुपयांचे कर्ज आहे. ते धनादेश वटविण्याकरिता बँकेत गेले असता पीक कर्ज भरल्याशिवाय रक्कम काढू शकणार नाही, असे सांगण्यात आले. वसंता मुडे यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. त्यांनी १६ क्विंटल कापूस येथील बाजार समितीत विकला. त्यापोटी त्यांना ६८ हजार रुपयांचा धनादेश मिळाला. त्यांच्यावर बँकेचे ९७ हजार रुपयांचे थकीत कर्ज आहे. त्यांचे खातेही बँकेने गोठविले आहे.(तालुका प्रतिनिधी)