बँक ही जनतेची संपत्ती ती कर्जबुडव्यांना विकू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 05:00 AM2021-12-17T05:00:00+5:302021-12-17T05:00:12+5:30
तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रीयीकृत बँक ही जनतेची संपत्ती आहे. ती कर्जबुडव्यांना विकून खासगीकरण करू नका, अशा मागणीकरिता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने दोन दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवशीच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखा बंद असल्याने व्यवहार प्रभावित झाले.
तत्कालीन पंतप्रधानांनी १९६९ साली दूरदृष्टी ठेवून बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने समाजातील शेवटच्या घटकाला बँकांची पायरी चढता आली. पण, आता शासनाने धनदांडग्या कर्जबुडव्यांना बँक विकण्याचा घाट रचला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
त्यामुळे खासगीकरणापासून राष्ट्रीयीकृत बँकांना वाचविण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या १३१ शाळा १६ आणि १७ डिसेंबरला बंद राहणार आहे. आज पहिल्या दिवशी सर्व शाखा बंद करुन बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटन विदर्भ युनिटने हातात फलके घेऊन शासनाच्या या खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. दोन दिवस बँकाचा संप राहणार असून शनिवारनंतर रविवारी सुटी आली आहे. त्यामुळे खातेदारांचीही मोठी अडचण होणार असून एटीएममध्येही ठणठणाट होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
खासगीकरणाचा काय होणार परिणाम...
- खाते उघडण्याकरिता पाच ते दहा हजार लागणार, लहान खातेदारांना कर्ज मिळीणे कठीण, चार्जेसच्या नावावर ग्राहकांचे शोषण. शेतकऱ्यांना कमी व्याजदारात पीककर्ज मिळणे बंद होऊन सक्तीने वसुली करणार. कर्जावरील व्याजाचा दर खासगी बँका ठरवतील. सरकारी योजना राबविणे कठीण जाणार. अनुदानासाठी खाते उघडणे अडचणीचे ठरतील. खासगी बँक श्रीमंतांना किंवा फायदा असणाऱ्यांनाच सेवा देणार तसेच बँक बुडण्याचेही प्रमाण वाढणार.
राष्ट्रीयीकृत बँकाच्या खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने दोन दिवस संप पुकारला आहे. राष्ट्रीयीकृत बँका ही जनतेची संपत्ती आहे. त्यामुळे खासगीकरण थांबवून ती धनदांडग्यांना विकून सर्वसामान्यांचे अहित साधले जाऊ नयेत,अशी आमची मागणी आहे. जिल्ह्यातील १३१ बँक शाखातील कर्मचारी या संपात सहभागी असून, दोन दिवसांत ४०० कोटींचे व्यवहार प्रभावित होणार आहे. या संपानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर बँक कर्मचाऱ्यांना बेमुदत संप करावा लागेल.
- वैभव लहाने, पदाधिकारी, बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटन विदर्भ युनिट