हैदराबादसह बँगलोर येथे बँक लूटीचा डाव उधळला; विविध राज्यात घरफोडी करणारा जेरबंद
By चैतन्य जोशी | Published: May 30, 2024 03:22 PM2024-05-30T15:22:36+5:302024-05-30T15:22:53+5:30
वर्षभरात घरफोडी, चोरीचे ९३ गुन्हे दाखल
वर्धा : देशातील विविध राज्यांतील गावांमध्ये घरफोडी, चोरी करणारा अट्टल घरफोड्या वर्धा पोलिसांच्या गळाला लागला असून त्याने वर्ध्यात चोरी केल्यानंतर त्यांचा हैदराबाद, बँगलोर, कर्नाटक येथे असलेल्या विविध राज्यातील बँकेचे लॉकर गुगुल मॅपवर सर्च करुन बँक लूटण्याचा डाव होता. मात्र, वर्धा पोलिसांनी त्याला अटक करुन त्याचा हा चोरीचा डाव उधळून लावला. प्रशांत काशीनाथ करोशी (३८ रा. इस्कुर्ली ता. करवीर जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या अट्टल घरफोड्याचे नाव आहे.
वर्धा शहरासह लगतच्या परिसरात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडीचे सत्र सुरु होते. त्याअनुषंगाने पोलिसांची चमू चोरट्याच्या रडारवर होती. अशातच दोन दिवसांपूर्वी शहरातील नालवाडी येथील शिवार्पण नगरातील रहिवासी नंदा मारुती सरोदे यांच्या घरी चोरी झाल्याने त्याचा शोध पोलिस घेत असताना अट्टल घरफोड्या प्रशांत हा संशयास्पद स्थितीत मिळून आला. त्याला पोलिसी हिसका दाखवला असता त्याने चोरीची कबूली दिली. आणखी विचारपूस केली असता त्याने वर्धा हद्दीत चार घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाेखंडी टॉमी, दोन स्क्रु ड्रायव्हर, ग्लास कटर आणि रोख रकमेसह दागिने असा एकूण ७ लाख २० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल ‘रिकव्हर’ केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा आणि वर्धा पोलिसांच्या चमूने केली.
..................
एक महिन्यापूर्वी केला होता ‘प्लॅन’
अट्टल घरफोड्या प्रशांत करोशी याने एक महिन्यांपूर्वी बेंगलोर, कर्नाटका, चेन्नई, तामिळनाडू, हैदराबाद, तेलंगणा येथे घरफोडी करण्याचा प्लॅन तयार केला होता. लॉजमध्ये राहून तो ज्या परिसरात मोठे हायप्राेफाईल बंगले आहेत अशा सोसायटीत किरायाच्या रिक्षाने फिरुन परिसराची रेकी करायचा. वर्ध्यातून चोरी केलेली रक्कम घेऊन तो हैदराबादसह बँगलोर येथील बँक लूटणार होता.
.................
देशातील विविध राज्यात वर्षभरात ९३ गुन्हे दाखल
चोरट्याने कोल्हापूर येथे ५४ घरफोडी, अहिल्यानगर येथे २ घरफोडीचा प्रयत्न, नंदूरबार जिल्ह्यातील शहदा येथे १ घरफोडी, १ प्रयत्न, दोन दुचाकी चोरी, धुळे जिल्ह्यात एक घरफोडी, ५ हजारांची रक्कम चोरी, तीन घरफोडीचे प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे दागिन्यांसह १५ हजारांची रक्कम, चाळीसगाव येथे दोन प्रयत्न, जळगाव शहरात दोन दुचाकी चोरी, अमरावती येथे तीन घरफोडू, एक दुचाकी चोरी, यवतमाळ येथील वडगाव येथे घरफोडी, पुणे शहरात पाच दुचाकी चोरी, लातुरात दोन दुचाकी, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एक, कर्नाटक येथील बेळगाव येथे चार घरफोडी, इंदोर येथे १ घरफोडी, अशा ६२ घरफोडी, १५ चोरीचे प्रयत्न, १३ दुचाकी चोरी असे ९० चोरीचे तसेच एक जबरी चोरी आणि दोन फसवणुकीचे असे ९३ गुन्ह्यांची उकल केली आहे.