शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँकांकडून केली जातेय टाळाटाळ
By admin | Published: May 30, 2015 12:10 AM2015-05-30T00:10:34+5:302015-05-30T00:10:34+5:30
शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यास सारवाडी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया टाळाटाळ करीत आहे.
कारंजा (घा.) : शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यास सारवाडी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया टाळाटाळ करीत आहे. गोड बोलून कर्ज व व्याजाची रक्कम भरण्यास सांगितले आणि पुन्हा कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दोन वर्षे कर्ज देता येणार नसल्याचे पत्रच सदर बँकेने देत हेकेखोरीचा प्रत्यय दिला, असा आरोप शेतकरी करीत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सततची नापिकी, कर्ज, ओला व कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कशीबशी पीक कर्जाची रक्कम जुळवून शेतकरी जुने कर्ज भरून नवीन वाढीव रक्कम मिळणार, या आशेने बँकांकडे पाहत आहे; पण बँक व्यवस्थापक शेतकऱ्यांना निराश केली असल्याचे दितसे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश असताना शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली केली जात आहे. शिवाय ऐन पेरणीच्या वेळी बोळवण केली जात आहे.
तालुक्यातील बोंदरठाणा येथील शेतकरी सत्यविजय बापुराव गाखरे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा सारवाडी येथून पीक कर्ज घेतले होते. या कर्जापोटी त्यांनी २८ एप्रिल रोजी मुद्दल ८६ हजार ४० रुपये अदा केले. शिवाय १३ मार्च रोजी २१ हजार ५०५ रुपयांचा भरणा करून मागील थकबाकीही अदा केली. यानंतर चालू हंगामाकरिता पीक कर्जाची मागणी केली असता सदर बँक पीक कर्ज देण्यास नकार देत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुम्हाला दोन वर्षे पीक कर्ज मिळत नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे जा की मुख्यमंत्र्याकडे, त्यांना घेऊन या तरी पीक कर्ज मिळणार नाही’, अशी दमदाटीही व्यवस्थापकाने केली. दुष्काळी परिस्थितीत कर्जमुक्तीसाठी जवळची रक्कम बँकेत भरल्याने व आता कर्ज नाकारल्याने शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. हे एकच नव्हे तर तालुक्यात अनेक प्रकरणे आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष कारवाई करावी व कर्ज मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकरी सत्यविजय गाखरे यांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)
बँक महाअदालतीत शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन गोडी-गुलाबीने कर्जाची वसुली करून घेतात. पीक कर्ज वाटपाची वेळ आल्यावर ते नाकारले जाते. नापिकी, कर्जबाजारीपणाने शेतकरी त्रस्त आहे. यातच कर्ज भरूनही पीक कर्ज मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कर्ज का भरावे, हा प्रश्नच आहे. बँकेने १२ मे रोजी कर्ज मिळणार नाही, असे पत्र दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.