खासगीकरणाविरूद्ध बँकांचा संप
By Admin | Published: March 1, 2017 12:52 AM2017-03-01T00:52:33+5:302017-03-01T00:52:33+5:30
आता बँकांमध्ये खासगीकरणाचा शिरकाव होत आहे. बहुतांश पदे ‘आऊट सोर्स’ करण्यात येत असल्याने बँकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.
कोट्यवधीचे व्यवहार ठप्प : खातेदार, व्यापाऱ्यांना फटका
वर्धा :आता बँकांमध्ये खासगीकरणाचा शिरकाव होत आहे. बहुतांश पदे ‘आऊट सोर्स’ करण्यात येत असल्याने बँकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. याविरूद्ध बँक अधिकारी, कर्मचारी संघटना एकवटल्या. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्यावतीने मंगळवारी याविरूद्ध संप पुकारण्यात आला. परिणामी, दिवसभर बँका बंद होत्या. यात कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झाले. खातेदार, व्यापारी, शेतकऱ्यांना याचा मोठाच फटका बसला.
शासनाकडून आता बँकांच्या धोरणात बदल केला जात आहे. बँकांमध्येही खासगीकरण केले जात आहे. कर्मचाऱ्यांची भरती करताना कंत्राट पद्धतीवर वा कंत्राटदार कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबविण्याचे धोरण आखले जात आहे. या धोरणाचा युनियनकडून विरोध केला जात आहे. शिवाय नोटबंदीच्या कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेळ काम करावे लागले. या काळातील भत्ता देण्यात यावा. या कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना गोंधळाच्या स्थितीमुळे जवळचा पैसा बँकेत भरावा लागला. ही रक्कम कर्मचाऱ्यांना माफ करण्यात यावी. इनकम टॅक्समध्ये बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्णत: सुट देण्यात यावी. वेतनवाढ निश्चितीची प्रक्रिया जलद गतीने राबवावी. भरती प्रकियेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. बँकांतील सर्व प्रकारची पदे भरावीत. बँकांचे कामकाज पाच दिवसांचे करावे, कर्ज थकविणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईची परवानगी द्यावी, आदी मागण्या या संपाद्वारे लावून धरण्यात आल्या आहेत.
नऊ संघटनांचा समावेश असलेल्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्यावतीने हा संप पुकारण्यात आला. शहरातील बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बँकांसमोर गोळा होत शासनाच्या या धोरणांचा निषेध केला. तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी बँक सुरू होत्या व आज संप असल्याने ग्राहकांना फटका बसला. अनेकांना आज कुठलेही व्यवहार करता न आल्याने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झाले होते.(कार्यालय प्रतिनिधी)