बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:07 PM2018-06-14T23:07:14+5:302018-06-14T23:07:14+5:30
केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही. काँगे्रस शासन काळात कर्ज वाटपात गैरप्रकार झाला. मोठ्या भांडवलदारांना दोनशे कोटीच्या कारखान्यासाठी हजार कोटींचे कर्ज या बँक अधिकाऱ्यांनी दिले; पण भाजप शासनाने शेतकरी कर्जमुक्तीचे आदेश दिले असताना बँक अधिकारी गरीब शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. बँकाचे लालफितशाही धोरण शेतकºयांच्या कर्जमुक्तीत अडसर ठरत आहे. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असा गंभीर इशारा खा. रामदास तडस यांनी दिला.
स्थानिक आर.के. हायस्कूलच्या सभागृहात शेतकरी पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खा. तडस पूढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना शासनाने सुरू केली. या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी ९८ हजार ४५५ अर्ज आले. पैकी ६६ हजार १०१ ग्रिनलिस्ट मध्ये आलेले शेतकरी आहे. त्यांच्या कर्जमाफीसाठी ४८५ कोटी मंजूर झाले; पण यापैकी केवळ ४४ हजार १८७ शेतकऱ्यांच्या खात्यात २६० कोटी जमा आहे. ३२,३५४ अर्जाबाबत कुठलीही माहिती नाही. २१,९१४ शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, प्रभारी तहसीलदार भागवत, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, जयंत येरावार, गजानन राऊत, दीपक फुलकरी उपस्थित होते. संचालन विनोद माहुरे यांनी केले तर आभार उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी मानले. यावेळी नितीन बडगे, कपील शुक्ला यासह शेतकरी व बँक अधिकारी उपस्थित होते.