बापलेकाची निर्घृण हत्या, आरोपीला अटक
By admin | Published: March 9, 2017 04:11 PM2017-03-09T16:11:13+5:302017-03-09T16:11:13+5:30
पैसे उधार मागितले असता दिले नाही म्हणून एका माथेफिरूने काठीने हल्ला करून बापलेकाची हत्या केल्याची घटना वर्ध्यात घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
इंझाळा (वर्धा), दि. ९ - पैसे उधार मागितले असता दिले नाही म्हणून एका माथेफिरूने काठीने हल्ला करून बापलेकाची हत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही घटना देवळी तालुक्यातील इंझाळा येथे गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपीला गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली असून त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नत्थू तुकाराम होले (७३) आणि संजय नत्थू होले (५३) अशी मृतकांची नावे आहेत. तर आरोपीचे नाव महादेव बरडे असे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मारेकऱ्याला ताब्यात घेताच त्याच्याकडून रक्ताने माखलेले कपडे आणि हत्येकरिता वापरलेली काठी जप्त करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव याने बुधवारी संजय होले याला काही कामाकरिता पैसे उधार मागितले होते. मात्र संजय याने पैसे देण्यास नकार दिला. या नकाराचा वचपा काढण्याकरिता आज सकाळी महादेव बरडे याने संजय होले याच्यावर हल्ला चढविला. यावेळी संजय शेतातील गोठ्यात काम करीत होता. यावेळी महादेव याने त्याच्याकडे असलेल्या काठीने संजयवर वार केले. याची माहिती त्याचे वडील नत्थू होले याना कळताच त्यांनी मुलाच्या बचावाकरिता गोठ्याकडे धाव घेतली. नत्थू होले गोठ्याकडे येत असल्याचे दिसताच याने त्याच्याकडे असलेल्या काठीने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. गावकऱ्यांना याची माहिती मिळातच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत दोनही जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करताच दोघांनाही मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पुलगाव ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेत पाहणी केली. येथे नागरिकांनी मारेकऱ्याला घेराव करून ठेवले होते. पोलीस येताच मारेकरी महादेव बरडे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मारण्याकरिता वापरण्यात आलेली काठी आणि त्याचे रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मृतकांवर गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
संजय यांचा मुलगा थोक्यात बचावला
होले परिवाराला संपविण्याच्या उद्दशानेच की काय आरोपी महादेव बरडे याने हल्ला चढविल्याची चर्चा आहे. घटनेच्या दिवशी होले यांच्या यवतमाळ येथील नातलगांकडे कार्यक्रम असल्याने घरातील महिला मंडळी तिथे गेल्या होत्या. तर आज सकाळची शेतातील कामे आटोपून नथू होले व त्यांचा संजय होले तसेच संजय यांचा मुलगा जाणार होते. या हल्ल्यात दोघांचा जीव गेला तर घरात झोपून असल्याने संजय यांचा मुलगा थोडक्यात बचावल्याची चर्चा आहे.