नदीतच होतेय बाप्पाचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:26 PM2017-08-31T22:26:33+5:302017-08-31T22:26:47+5:30
मूर्ती विसर्जनाने होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम हौद तयार करून त्यात गणरायांचे विसर्जन करावे, अशा संबंधीतांच्या सूचना आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/पवनार : मूर्ती विसर्जनाने होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम हौद तयार करून त्यात गणरायांचे विसर्जन करावे, अशा संबंधीतांच्या सूचना आहेत. परंतु, सध्या पवनार येथील धाम नदीपात्रात बाप्पाचे विसर्जन केले जात आहे. पवनारात विसर्जनासाठी हौद तयार करणे गरजेचे असताना त्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आहे. जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे पवनारची धाम नदी प्रदूषित होण्याची शक्यता बळावत आहे.
नजीकचे पवनार हे गाव गेल्या काही वर्षांपासून आपली वेगळी ओळख जपत आहे. या गावातून जाणारी धाम नदी ही वर्धेकरांची तहाण भागवते. परंतु, याच नदीपात्रात गणेशोत्सवादरम्यान मातीच्या तसेच प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात. अनेक भाविक निर्माल्य नदी पात्रातच विसर्जित करतात. यामुळे होणाºया जल प्रदूषणात वाढ होते. विसर्जन उत्सवादरम्यान जल प्रदूषणाला आळा घालता यावा, यासाठी शासकीय स्तरासह न्यायालयीन स्तरावरून काही मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. परंतु, त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षच केले जात आहे.
वास्तविक पाहता पवनार येथे विसर्जन सोहळ्यादरम्यान जल प्रदूषण होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन तेथे कृत्रिम हौद तयार करणे क्रमप्राप्त होते. पण, याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या थेट नदीपात्रातच बाप्पाचे विसर्जन होत आहे. परिणामी, पवनारात होणाºया जल प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह तेथील ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
हिंगणघाटात वणा नदीच्या तिरावर गणरायाच्या विसर्जनासाठी हौदाची व्यवस्था
हिंगणघाट - गणेशोत्सव सध्या अंतिम टप्प्यात येत असून हजारो भाविक आपल्या लाडक्या गणराची मूर्ती नदी व जलाशयात विसर्जित करतात. त्यामुळे जल प्रदूषणात वाढ होत नदीही प्रदूषित होते. होणारे जल प्रदूषण व नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यंदाही वणा नदीच्या तिरावर कृत्रिम हौदाची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांना प्रबोधन करण्यासाठी व हौदात गणेश मुर्तीचे विसर्जन करून घेण्याकरिता तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी पर्यावरण संवर्धन संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहकार्य करणार आहेत. हौद तयार करण्याचे हे यंदाचे तिसरे वर्ष असून भाविकांनी यातच बाप्पाचे विसर्जन करावे, अशी विनंती आशिष भोयर, प्रा. अभिजित डाखोरे, प्रदिप गिरडे, रमेश झाडे, सतीश चौधरी यांच्यासह यांनी नगराध्यक्ष व न.पं. मुख्याधिकाºयांनी आणि पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. नुकतीच या हौदाची पाहणी वरिल मान्यवरांनी केली.
नदी व जलाशये प्रदूषित होऊ नये म्हणून योग्य सूचना जिल्ह्यातील नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात आल्या आहेत. पवनारची धाम प्रदूषित होऊ नये म्हणून मोठ्या विसर्जन कुंडाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे काम लवकरच सुरू होऊन सहा-सात महिन्यात कुंड तयार होईल.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी वर्धा.
गणपती मूर्ती विसर्जन सोहळ्यामुळे गावात यात्रेचे स्वरूप येते. आठ ते दहा हजार मुर्तींचे विसर्जन धाम नदीत दरवर्षी होते. होणाºया नदी प्रदूषणाचे वास्तव जिल्हा प्रशासनाला सहज कळावे यासाठी दोन वर्ष आम्ही स्वत: नदी पात्र स्वच्छ केली. ग्रा.पं.ने पुढाकार घेऊन नुकतेच निर्माल्यकुंड तयार केले आहे. नागरिकांनी निर्माल्य नदीत न विसर्जित करता घरीच कुंडीत साठवून त्यापासून खत तयार करावे व ते झाडाला द्यावे. खºया अर्थाने नागरिकांची मानसिकता बदलल्यास प्रभावी कार्य होईल.
- अजय गांडोळे, सरपंच, पवनार.