बापू कुटीला भेट देत स्वीकारला पदभार
By admin | Published: May 31, 2015 01:41 AM2015-05-31T01:41:00+5:302015-05-31T01:41:00+5:30
महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद असून वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यात येईल.
नवीन सोना यांना निरोप : नवीन जिल्हाधिकारी रूजू
वर्धा : महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद असून वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी एक टीम म्हणून काम करण्याचा मनोदय नवनियुक्त जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केला.
वर्ध्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्याकडून पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या आश्रमामध्ये भेट देत बापू कुटीत प्रार्थनाही केली.
नवीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अमरावती येथे प्रारंभी प्रोबेशन सेवा काळ पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर येथे उपविभागीय महसूल अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या काळात ग्रामविकासाच्या विविध योजना राबविल्या. जिल्ह्याच्या विकासाकरिता गरजेचे असलेले निर्णय तत्परतेने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून भरीव कामाची अपेक्षा वर्धेकर करीत आहेत.
नवीन सोना यांना निरोप
मावळते जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना निरोप तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या स्वागताचा कार्यक्रम विकास भवन येथे अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
जिल्ह्याच्या विकासासोबतच नवीन उपक्रम राबविताना जिल्ह्यातील जनतेचे तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगताना एन. नवीन सोना म्हणाले की वर्धा जिल्हा इ-जिल्हा करण्याचा यशस्वी प्रकल्प राबविल्याचे म्हणाले. देशात सर्वप्रथम जीआयएस प्रणालीवर आधारीत क्राईम मॅपिंग करण्यासोबतच मोबाईल पंचनामा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात केल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले निर्णय तत्परतेने घेवून ते प्रभावीपणे राबविण्याला प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. जनतेला शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ व सेवा सहज व सुलभपणे करण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कर्मचारी संघटनेतर्फे शैलेंद्र देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन अतुल रासपायले यांनी केले. आभार उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले. व्यासपीठावर उपवसंरक्षक मुकेश गाणात्रा, उपजिल्हाधिकारी वालस्कर, जैन, शिरीष पांडे, आर्वी उपविभागीय अधिकारी फडके उपस्थित होते.