४२ हजार मीटर सूत कताईतून बापूंना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:45 PM2017-10-02T22:45:31+5:302017-10-02T22:45:59+5:30
महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रपित्याच्या १४४ व्या जयंती दिनी अखंड सूत्रयज्ञाने आदरांजली अर्पण करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रपित्याच्या १४४ व्या जयंती दिनी अखंड सूत्रयज्ञाने आदरांजली अर्पण करण्यात आली. सकाळपासून सुरू झालेल्या या सुत्रयज्ञात एकूण ४२ हजार मीटर सूत कातण्यात आले. गांधी जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी नई तालीम परिसरातील घंटा घर ते बापूकुटी, अशी रामधुन गात प्रभातफेरी काढण्यात आली. बापूकुटी प्रांगणात सर्व लोक आल्यानंतर प्रात: प्रार्थना झाली. यानंतर अखंड सूत्रयज्ञाला प्रारंभ झाला. यात कार्यकर्ता, पर्यटक व गांधीपे्रमींनी पेटीचरखा, अंबर चरखा आणि लाकडी मोठ्या चरख्यावर सूत कताई केली. यावेळी लाकडी मोठा चरखा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. अखंड सूतकताईला कुसूम पांडे, नत्थूजी चव्हाण, डॉ. शिवचरण ठाकुर, प्रशांत ताकसांडे यांनी प्रारंभ केला. सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत प्रार्थना भूमीवर सामूहिक सूतकताई झाल्यानंतर सायंकाळी दैनिक प्रार्थना झाली. रात्री बापूकुटी परिसरात एक तास सर्व धर्मीय भजने झालीत.
सूत कताई करून मुख्यमंत्र्यांचे बापूंना अभिवादन
गांधी फॉर टुमारो प्रकल्पांतर्गत सेवाग्राम आश्रमाचा विकास
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधी जंयती दिनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. भेटीदरम्यान ते बापू कुटी येथील सामूदायिक प्राथनेत सहभागी झाले. शिवाय चरख्यावर सूत कातून त्यांनी गांधीजीना विनम्र अभिवादन केले.
यावेळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक तसेच जल स्त्रोत व नदी विकास मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सचिव डॉ. श्रीराम जाधव, ज्येष्ठ गांधीवादी अॅड. मा.म. गडकरी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.
खादीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खादीच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात खादी उत्पादनाचा आराखडा तयार करून राज्य खादी बोर्डाच्या माध्यमातून राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम आश्रम परिसरात दिली. सोबतच या संदर्भात इतर राज्याशी केंद्राच्या माध्यमातून चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन
ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तयार केलेल्या ट्रेडल पंप तसेच पशुखाद्यासह विविध उत्पादनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. ट्रेडल पंपाच्या माध्यमातून विजेशिवाय परसबाग, फुल शेती तसेच छोट्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अल्पभुधारक शेतकºयांना या पंपाचा लाभ देण्याची सूचना अधिकाºयांना केली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे सेवाग्राम आश्रम परिसरात बचत गटाच्या उत्पादनाची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली.
खादी उत्पादनाकरिता मास्टर प्लानची मागणी
सेवाग्राम- महाराष्ट्रात खादीच्या उत्पादनाच्या चार पट खादीची विक्री होते; पण ७५ टक्के खादी मात्र महाराष्ट्राच्या बाहेरुन येते. दुष्काळी जिल्ह्यात रोजगाराच्या आणि खादी उत्पादनाच्या खुप संधी आहेत. महाराष्ट्रातील खादी ग्रामोद्योग संस्था व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग बोर्डाचे पदाधिकारी, अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलवून खादी उत्पादनाच्या कार्याचा मास्टर प्लान तयार होऊ शकतो. याबाबत बैठकीचे आयोजन करावे, अशी विनंती निवेदनातून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली.