हिवताप जनजागृती रॅलीचा बापू कुटीत समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:31 PM2018-04-27T23:31:33+5:302018-04-27T23:31:33+5:30
देशभरात २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केल्या जातो. याच दिवसाचे औचित्य साधून हिवताप जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप सेवाग्राम येथील बापू कुटीत झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशभरात २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केल्या जातो. याच दिवसाचे औचित्य साधून हिवताप जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप सेवाग्राम येथील बापू कुटीत झाला. सदर रॅलीत सहभागी चित्ररथाच्यामाध्यमातून ठिकठिकाणी तज्ज्ञ मंडळींनी कीटकजन्य आजार विषयावर मार्गदर्शन केले. हा उपक्रम आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आला.
जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारायकर, जिल्हा प्रशिक्षण पथकचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवतकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. धाकटे, साथरोग तंत्रज्ञ डॉ. झलके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रॅलीची सुरूवात झाली. या सायकल रॅलीमध्ये आरोग्य विभागाचा चित्ररथ सहभागी होता. सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणाऱ्या याच चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना तज्ज्ञ मंडळींनी किटकजन्य आजाराची माहिती व उपाययोजनांची माहिती साप्या शब्दात दिली. सदर सायकल रॅलीचे शहरातील बजाज चौक, इंगोले चौक, डॉ. रायजादा क्लिनिक मार्गे पोस्ट आॅफीस चौक ते सेवाग्राम येथील बापू कूटी गाठली. यावेळी समारोपीय कार्यक्रम पार पडला. या रॅलीच्या माध्यमातून हिवताप, हत्तीरोग आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली. रॅलीत आरोग्य विभाग व हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग, प्रशिक्षण पथक आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सेवाग्राम येथील नई तालीम येथील शांतीभवनात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाला कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्रामचे सचिव डॉ. बी.एस गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, नई तालीम सेवाग्रामचे सचिव डॉ. शिवचरणसिंग ठाकूर, डॉ. रेवतकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस सुतमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. व्यासपीठावरील उपस्थितांचे स्वागत ग्रामगिता देवून करण्यात आले. डॉ. अजय डवले यांनी जिल्ह्यात हिवतापाची स्थिती सर्व्हेक्षण प्रतिबंधात्मक उपाययोजने विषयी मार्गदर्शन करताना सांगितले. डॉ. ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना हिवतापाच्या वर्तमान परिस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. गर्ग यांनी हिवताप उपचार, केंद्र शासनाची हिवताप विषयक भूमिका विषद केली. तसेच आशा सेविका यांच्या कार्याची दखल घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण धाकटे यांनी केले. तर संचालन अरविंद लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाला नई तालीम या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कासाबाई नर्सिग स्कूलच्या विद्यार्थिनी यांच्यासह काळसर्पे, पाटील, नंदनवार, मानकर, बोटकुले, ढगे, गावंडे, कुमरे, जाधव, तायवाडे, चंद्रे, पोथारे, भोयर आदींची उपस्थिती होती. सदर जनजागृतीपर सायकल रॅलीच्या माध्यमातून हिवताप म्हणजे काय याची माहिती नागरिकांना देण्यात आली.