बापूकुटी, आदीनिवासला शिंदूल्याच्या झांज्यांचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:34 PM2018-06-15T23:34:05+5:302018-06-15T23:34:05+5:30
देश-विदेशातील अनेक पर्यटकांसाठी महात्मा गांधीजींचे आश्रम प्रेरणा स्थान बनले आहे. या आश्रमातील स्मारके माती आणि कुडाचे असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण करण्याकरिता शिंदोल्यांच्या झांज्या बांधण्यात येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : देश-विदेशातील अनेक पर्यटकांसाठी महात्मा गांधीजींचे आश्रम प्रेरणा स्थान बनले आहे. या आश्रमातील स्मारके माती आणि कुडाचे असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण करण्याकरिता शिंदोल्यांच्या झांज्या बांधण्यात येतात. या झांज्या सध्या स्मारकांसाठी कवच बनल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही पद्धत आजही कायम आहे.
गांधीजी १२ वर्षांपर्यंत सेवाग्राम येथील आश्रमात राहिले. सेवाग्राम त्यांची कर्मभूमी व प्रयोगभूमी राहिली. देशातील सामाजिक व राजनितिक हालचालींचे हे केंद्र राहिल्याने सदैव कार्यकर्ता व देशातील प्रमुख नेते आश्रमात येत असतात. गांधीजींनी सेवाग्रामला राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक साधन, साहित्य व कारागीर यांच्या माध्यमातून आश्रमात कुट्या तयार झाल्या. बापू व बा यांच्या कुट्या व दप्तर माती व कुडापासून बनविले असल्याने पावसाळ्यात संरक्षणाची व्यवस्था करावी लागते. त्या काळी याच शिंदोल्यांच्या झांज्या बांधल्या जात होत्या. आश्रमला ८२ वर्षांचा काळ झाला. आजही ही पंरपरा कायम आहे. आश्रम व्यवस्थापन आजही त्याच पध्दतीने कुटीचे संरक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे दिसून येते.
काळ बदला. साधन साहित्यातही बदल होऊन काही समस्यांचा सामना व्यवस्थापकांना करावा लागत आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या झांज्या दूर्मिळ होत चालल्या आहे. या वर्षी जुनोना या ठिकाणाहून शिंदोल्यांच्या पाणोळ्या आणाव्या लागल्या. काही जुन्या सुरक्षित ठेवलेल्या व काही नव्या अशांच्या झापड्या बनवून स्मारकांना लावण्यात आल्या. अनेक वर्षांची ही परंपरा आजही जोपासली जात आहे. सर्व स्मारकांना सुरक्षित ठेवून येणाऱ्या पिढीला गांधीजी आणि त्यांचा आश्रम पाहायला मिळावा, यासाठी आश्रम प्रतिष्ठान प्रयत्नरत आहे.
आधुनिक साहित्याला नकारच
महात्मा गांधी या कुटीत राहावयास आले तेव्हा नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून अत्यल्प खर्चात निवासाची सोय करण्याची अट त्यांनी ठेवली होती. त्या अटीनुसार येथे कुटी निर्माण झाली. आज विज्ञानाने अनेक शोध लावले आहेत. या शोधात पावसापासून बचावाकरिता प्लास्टिक सारख्या वस्तू आहेत. असे असताना त्यांच्याकडून अशा कुठल्याही वस्तूंचा वापर येथे केला जात नाही. आजही जुन्याच पारंपरिक साहित्याच्या वापरातून कुटींचे रक्षण होत आहे.
पर्यटकांसाठी खुले
आंतरराष्ट्रीय स्तरावरील व स्वातंत्र्य चळवळीची साक्षीदार आदिनिवासच्या वऱ्हांडा व गांधीजींच्या स्नानग्रुहाच्या छताच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले. ते पर्यटकांकरिता खुले करण्यात आले आहे. शिवाय पावसापासून बचावाकरिता नेहमीप्रमाणे पाणोळ्यांचे आवरण लावण्यात आले आहे.
गांधीजींनी सेवाग्रामला राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम बनविलेली कुटी म्हणजे आदिनिवास होय. ही कुटी बांबू, बोरा, बल्ली, कवेलू, माती आदींपासून बनविली होती. वास्तूची सुरक्षितता आश्रमसाठी महत्त्वाचा विषय आहे. पवसाळ्यात विषेश काळजी घेतली जाते.