जागतिक प्रश्नांचे उत्तर बापूंच्या एकादश व्रतात सापडते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:30 PM2019-03-01T12:30:40+5:302019-03-01T12:31:31+5:30
देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम (वर्धा) : देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.
महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने जनसहयोग ट्रस्ट व्दारे सेवाग्राम आश्रम परिसरातील नई तालीम येथे २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान गांधी विज्ञान संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना डॉ. अभय बंग बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी विज्ञान हे नैतिक किंवा अनैतिक नसून ननैतिक असते. विज्ञानामध्ये नैतिकतेचा वापर गांधीजींनी केला, असे सांगून आजच्या काळात गांधी कुठे आहेत? असा प्रश्नही डॉ.बंग यांनी उपस्थित केला. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ.अनिल सदगोपाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी मुंबईचे ९५ वर्षीय गांधीवादी डॉ. जी.जी.पारीख होते. मान्यवरांनी ‘वैज्ञानिक ता आणि गांधीजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘गांधीजींच्या वैज्ञानिक दृष्टीच्या प्रकाशात’ या विषयाच्या अनुषंगाने व्याख्यान व चर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रवींद्र पंढरीनाथ, सोपान जोशी, अतुल देऊळगावकर, आनंद माझगांवकर व प्रदीप शर्मा यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय र.र.यांनी केले. या कार्यक्रमाला देशभरातील गांधी विचारवंत तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.