‘बापू दप्तर’चे होणार नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:26+5:30
ही झोपडी अत्यंत साधी नि कमी खर्चिक आहे. अर्धवट भिंती, बांबूच्या झापड्या असे स्वरूप असून भिंती कुडाच्या आहेत. याला पायवा नाही. जमिनीत बल्ली टाकून झोपडी बनविण्यात आलेली आहे. या दप्तरात गांधीजींचा टेलिफोन, साहित्य, साप पकडण्याचा चिमटा, टंकलेखन यंत्र आदी ठेवण्यात आले होते. आता हे सर्व साहित्य आखरी निवासमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यातरी बल्ली आणि बांबूचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सेवाग्राम गांधीजींच्या वास्तव्य आणि कायार्मुळे जगात प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्य चळवळीत तर प्रमुख केंद्रच बनले होते. कार्याचा आवाका पाहता स्वतंत्र कार्यालच करावे लागले, जे आज बापू दप्तर म्हणून ओळखले जाते. गेली अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेल्या आणि स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार असलेल्या या दप्तरचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याने तेथील साहित्य, वस्तू आखरी निवासमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.
विशेष म्हणजे दप्तरचे पहिल्यांदाच दुरुस्ती करण्यात येत आहे. जगाला गांधींची ओळख त्यांच्या अहिंसक आंदोलन आणि सामूहिक जीवन पद्धतीमुळे झाली. दक्षिण आफ्रिकेतील कार्यानंतर गांधीजी मायदेशी परतले. साबरमती आश्रमातून कार्याला सुरुवात करण्यात आली. मिठाच्या सत्याग्रहानंतर बापू १९३६ मध्ये सेवाग्राम येथे आले, तो काळ आणि वेळ इतिहासात नोंद करणारी ठरली. स्वातंत्र्य चळवळीचेच नव्हे, तर अन्य कार्याचे आश्रम मुख्य केंद्र ठरले होते. त्यामुळे जगाचे लक्ष बापूंच्या ध्येय धोरणाकडे लागले होते. कामाचा आवाका पाहता बापूंची मानस कन्या मीरा बहन यांनी आपली झोपडी बापू दप्तरसाठी दिली.
ही झोपडी अत्यंत साधी नि कमी खर्चिक आहे. अर्धवट भिंती, बांबूच्या झापड्या असे स्वरूप असून भिंती कुडाच्या आहेत. याला पायवा नाही. जमिनीत बल्ली टाकून झोपडी बनविण्यात आलेली आहे. या दप्तरात गांधीजींचा टेलिफोन, साहित्य, साप पकडण्याचा चिमटा, टंकलेखन यंत्र आदी ठेवण्यात आले होते. आता हे सर्व साहित्य आखरी निवासमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यातरी बल्ली आणि बांबूचे काम सुरू आहे.
टिकाऊपणा कायम ठेवण्यासाठी मोरचूद, गोमूत्र अर्क आदींचे पाणी करून त्यात बांबू ठेवण्यात येणार आहेत. बापू दप्तर जसे आहे तसेच तयार केले जाणार असून यासाठी झारखंड येथील मजूर येणार आहेत. संपूर्ण काम वास्तूकलाशास्त्राचे अभ्यासक अभय मलिये यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.
दप्तरचे प्रथमच नूतनीकरण करण्यात येत आहे. जुने जमिनीला समांतर असल्याने विशेष काळजी घ्यावी लागली. बापूंचा विचार महत्त्वाचा आणि हे स्मारकसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. दुरुस्ती आवश्यक आहे. दप्तरचे आयुष्य वाढावे, ते अबाधित राहावे हा आमचा प्रयत्न आहे. याच महिन्यात कार्य सुरू होणार आहे.
- मुकुंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.