मर्चंट नेव्हीच्या नावाखाली वर्धेत बोगस परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:18 AM2017-11-06T00:18:07+5:302017-11-06T00:18:17+5:30
येथील सुशील हिंम्मतसिगका विद्यालयात मर्चंट नेव्हीच्या परीक्षेसाठी एकत्रित झालेल्या सुमारे १५० युवकांनी फसवणूक केल्या जात असल्याचा आरोप करीत रविवारी सकाळच्या सुमारास परीक्षा उधळून लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील सुशील हिंम्मतसिगका विद्यालयात मर्चंट नेव्हीच्या परीक्षेसाठी एकत्रित झालेल्या सुमारे १५० युवकांनी फसवणूक केल्या जात असल्याचा आरोप करीत रविवारी सकाळच्या सुमारास परीक्षा उधळून लावली. त्यानंतर या युवकांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून सदर घटनेची तक्रार नोंदविली. या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मर्र्चंट नेव्हीची परीक्षा असल्याचे म्हणत आलेल्या जाहिरातीवरून अनेक युवकांनी या परीक्षेकरिता अर्ज केले. या अर्जानुसार त्यांना मोबाईलवर एसएमएस आले. या सूचनेवरून अनेक युवक वर्धेतील सुशील हिम्मतसिंगका शाळेत असलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, परीक्षा घेणारा रामेश्वर भिकुराव लेकुळे (२२) रा. मुंबई हा युवक परीक्षा केंद्रावर वेळेनंतर पोहोचला. त्याने परीक्षा अर्धातासनंतर सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदर युवकाने परीक्षार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे प्रत्येकी ५०० रुपयांची मागणी केली. दरम्यान काही परीक्षार्थ्यांनी त्याच्यावर संशय आल्याने त्याला ओळखपत्राची व आवश्यक कागदपत्राची मागणी केली.
असे कुठलेही कागदपत्र नसल्याचे लक्षात येताच परीक्षार्थ्यांमध्ये रोष वाढला. आपली फसवणुक झाल्याचा आरोप करीत परीक्षार्थ्यांनी परीक्षा उधळून थेट शहर पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदविली. पोलिसांनीही परीक्षार्थ्यांची तक्रार नोंदवून घेत सध्या कुठलाही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. सदर प्रकार काय, त्यात काय सत्यता आहे, याची शहानिशा करूनच गुन्ह्याची नोंद घेण्यात येईल असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. या तपासाकडे अनेकांच्या नजरा आहेत.
परीक्षा घेणाºयाकडे ओळखपत्रही नाही
परीक्षा घेणाºया रामेश्वर लेकुळे याच्याकडे तो कुठल्या कंपनीत काम करतो त्याबाबतचा साधा पुरावाही नव्हता. परिणामी, परीक्षार्थ्यांनी आपली फसवणुक केल्या जात असल्याचा आरोप करीत चांगलाच राडा घातला. सायंकाळी उशीरापर्यंत सदर प्रकार काय याची चौकशी पोलिसांकडून सुरू होती.
सी अँकर मुंबई या कंपनीसाठी आपण काम करतो. वरिष्ठांच्या आदेशावरून आपण वर्धेत परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. परीक्षार्थ्यांना आपण परीक्षेसाठी ५०० रुपये सांगितले होते. परंतु, कुणाकडूनच पैसे घेतले नाही. १०० तरुणांची या केंद्रातून परीक्षा घेणे क्रमप्राप्त होते.
- रामेश्वर लेकुळे, परीक्षा संयोजक.
सदर प्रकरणी परीक्षार्थ्यांची तक्रार घेतली आहे. या संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. सध्या चौकशी सुरू आहे.
- शुभांगी ताकीत, पोलीस उपनिरीक्षक, शहर पोलीस ठाणे वर्धा.