केळी उत्पादकांवर अस्मानी
By admin | Published: June 5, 2015 02:12 AM2015-06-05T02:12:11+5:302015-06-05T02:12:11+5:30
केळी बागायतदारांचा तालुका म्हणून सेलूची ओळख आहे; पण केळीच्या बागा नावापूरत्याच शिल्लक राहिल्या आहेत.
आर्थिक विवंचनेत भर : पारा ४७ अंशांवर गेल्याने बागा करपल्या
विजय माहुरे सेलू
केळी बागायतदारांचा तालुका म्हणून सेलूची ओळख आहे; पण केळीच्या बागा नावापूरत्याच शिल्लक राहिल्या आहेत. यातही अस्मानी व सुलतानी संकटात त्या सापडल्या आहेत. गत १५ दिवसांतील वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील केळीच्या बागा करपल्या आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
१८ महिन्यांचे केळीचे पीक महागडे आहे. या पिकाला उन्हाळ्याच्या दिवसांत व पावसाळा लागण्यापूर्वी येणाऱ्या वादळ, वाऱ्यापासून बचाव झाला तर केळीचे पीक पावसाळ्यात येणाऱ्या खरीप हंगामातील खर्चाला हातभार लावण्यास सार्थकी ठरते; पण यावर्षी मे महिन्यात पारा ४७ अंशांवर गेल्याने केळीच्या घडाला मार बसला. बहुतांश घडे गळून पडले तर पाने सुकण्याच्या मार्गावर होते. यामुळे सूर्याचे किरण बागायती शेतात जमिनीवर पडत असल्याने केलेले ओलित सुकत होते. यातच केळी उत्पादक शेतकऱ्याला वीज भारनियमनामुळे ओलितासाठी तारेवरची कसरत करावी लागली. रात्रीचा दिवस करण्याची वेळ त्यांच्यावर आली. अशातच मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळाने या परिश्रमावर काही प्रमाणात पाणी फेरले गेले. वडगाव रेहकी व घोराड शिवारात केळीची झाडे कोलमडून पडली. यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. वटपौर्णिमेपासून केळीचे घड कापून विक्रीस येत असत; पण अद्यापही कडक उन्ह तापत असल्याने कापणीला सुरूवात झालेली नाही.
केळी पिकाला येणारा खर्च हा इतर पिकाच्या तुलनेत महागडा आहे. केळीचे रोपटेही नाशिक जिल्ह्यातून आणले जातात. यासाठी पैसे मोजावेच लागतात. शेणखत, रासायनिक खत, चाळण, ओढण, पाने कापणे आणि लावण तसेच केळीची झाडे खोदून बाहेर काढणे यासाठी वेळोवेळी खर्च करावा लागतो. हा खर्च पाहता केळीला परवडण्याजोगा भाव मिळेलच, याची शाश्वती राहिलेली नाही. ठिबक सिंचनासाठी केलेला खर्च व याच उत्पन्नावर असलेली आर्थिक घडी अस्मानी व सुलतानी संकटाने बिकट होत आहे. यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह केळी उत्पादकही आर्थिक संकटात सापडले आहेत.
१८ महिन्यांचे महागडे पीक १५ दिवसांच्या उन्हाने धोक्यात
पूर्वी सेलू तालुक्यात सर्वाधिक केळी पिकविली जात होती. हे पीक १८ महिन्यांचे असून यासाठी मोठा खर्च करावा लागतो. केळीची रोपेही शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातून आणावी लागतात. यासाठीही भरमसाठ खर्च लागतो. शिवाय १८ महिन्यांपर्यंत त्या पिकाची जपणूक करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची दमछाक होते. यातही हमखास उत्पादन होईलच, याची हमी राहिलेली नाही. उन्हाळ्यात तापमान अधिक वाढल्यास केळीच्या बागा कपरतात. मे महिन्यात सतत १५ दिवस पारा ४७ अंशांवर गेल्याने केळीच्या बागा धोक्यात आल्या असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.