बारशीला वरुण बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 09:32 PM2018-09-21T21:32:46+5:302018-09-21T21:34:18+5:30
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. त्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आदी उभी पीक करपून उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली होती. इतकेच नव्हे तर सध्यास्थितीत जिल्ह्यातील ११ जलायशांमध्ये केवळ ३९.३२ टक्के पाणी शिल्लक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. त्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आदी उभी पीक करपून उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली होती. इतकेच नव्हे तर सध्यास्थितीत जिल्ह्यातील ११ जलायशांमध्ये केवळ ३९.३२ टक्के पाणी शिल्लक आहे. पुढील काळात जिल्ह्यात मुसळधार पाऊस न झाल्यास वर्धेकरांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. शुक्रवारी बारशीच्या दिवशी परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पोथरा प्रकल्प १०० टक्के आणि लाल नाला प्रकल्प ९४ टक्के भरला असला तरी जिल्ह्यातील उर्वरित जलायशयांतील पाणी पातळी अतिशय अल्प असल्याचे वास्तव आहे. सध्यास्थितीत बोर प्रकल्पात ३१.३३, निम्न वर्धा प्रकल्पात २७.६७, धाम प्रकल्पात ३७.६५, पंचधारा प्रकल्पात २४.९१, डोंगरगाव प्रकल्प ७३.९२, मदन प्रकल्प ४९.३२, मदन उन्नई प्रकल्प १०.१५, वर्धा कार नदी प्रकल्प ३७.९३ तर सुकळी लघु प्रकल्पात ३६.८७ टक्के पाणी शिल्लक आहे. यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस शेत पिकांसाठी फायद्याचा ठरला असला तरी मुसळधार पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी पातळीत वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी याच दिवशी जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये ५८.३६ टक्के पाणी होते. मात्र, यंदाच्या वर्षी पावसाअभावी जलाशयात केवळ ३९.३२ टक्के पाणी शिल्लक आहेत. सप्टेंबर महिन्यात ओढावणारी ही परिस्थिती वर्धेकरांवर ऐरवी उन्हाळ्यात येत असे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास तूर, सोयाबीन, कापूस आदी उभी पीक करपून उत्पादनात घट येण्याची तसेच नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांसह जल तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
४.७ लाख हेक्टर वरील पीक धोक्यात
जिल्ह्यात यंदाच्यावर्षी ६२ हजार ८८२.५ हेक्टरवर तूर, १ लाख १५ हजार ६६९ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख २९ हजार ५ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. सुरूवातीला पावसाने हूलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, नंतर समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीच्या कामांना शेतकऱ्यांनी वेग दिला. जिल्ह्यातील जलाशयांचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्यात येते. परंतु, सध्या अनेक जलाशये तळ दाखवत असल्याने यंदा सिंचनासाठीही शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीणच आहे. परिणामी, तूर व कापूस तसेच सोयाबीन पीक पाण्याअभावी धोक्यातच असल्याचे शेतकरी सांगतात.
सोयाबीनवर लष्करीअळीचा प्रादुर्भाव
यंदाच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची निवड करताना अर्ली प्रजातीच्या बियाण्याची निवड करून त्याची लागवड केली. सध्या सदर पीक अंतीम टप्प्यात असून काही शेतकरी सोयाबीनची कापणीही करीत आहेत. असे असले तरी गत वर्षीच्या तूलनेत यंदा उत्पादनात घट येत असल्याचे काही सोयाबीन शेतकरी सांगतात. तर जे सोयाबीन पीक सध्या शेतात उभे आहे. त्या पिकांवर बऱ्यापैकी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली असून त्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.
३४.९८ टक्के पावसाची तूट
ऐरवी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सरासरी १८२.६३ पाऊस पडतो. मात्र सध्या पावसाने जिल्ह्याकडे पाठ दाखविल्याचे वास्तव आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा ३४.९८ टक्के पाऊस जिल्ह्यात कमी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ज्यांनी सोयाबीनची पेरणी केली त्यांचे सोयाबीन बºयापैकी भरले. परंतु, नंतरच्या पेरणीतील सोयाबीन पीक पोटलोट झाले आहे. तसेच कपाशीबाबतही झाले आहे. ज्यांनी सहा, सात व आठ जूनला लागवड केली त्यांच्या कपाशीला चांगले बोंड आहेत. परंतु, नंतरच्या कपाशीला पाहिजे तशी बोंड आलेली नाही. आता जर पाऊस आला तर कपाशी व तूर या पिकाला फायदाच आहे; पण सोयाबीनचे नुकसान होईल.
- राजेंद्र दहाघाने, शेतकरी.
सोयाबीन पीक अपुऱ्या पावसामुळे पोट लोट होण्याची शक्यता आहे. तसेच लष्करीअळीमुळे अडचणीत भर पडली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
-भाष्कर काकडे, शेतकरी.
या पावसाचा कपाशीला फायदा होईल. शिवाय दमदार पाऊस आल्यास पाणी पातळीत वाढ होईल. जर पावसाने पाठ फिरविली तर यंदा उन्हाळ्यापूर्वीच जलसंकटाला सोमोरे जावे लागणार आहे.
-विजय बेलसरे, शेतकरी.