‘बार्टी’चा सावळा गोंधळ; परीक्षार्थींना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 05:00 AM2022-08-01T05:00:00+5:302022-08-01T05:00:01+5:30

बार्टीकडे १ हजार ११८ परीक्षार्थ्यांकरिता प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेची मागणीही संबंधित संस्थेने केली होती. रविवारी दोन्ही परीक्षा केंद्रावर परीक्षेकरिता परीक्षार्थी व कर्मचारी उपस्थित राहून परीक्षेला सुरुवात करण्यात आली. यशवंत आर्टस कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या. त्याच दरम्यान लोक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वितरित करत असताना प्रश्नप्रत्रिका कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला.

'Barty''s shadow confusion; Exams suffer | ‘बार्टी’चा सावळा गोंधळ; परीक्षार्थींना मनस्ताप

‘बार्टी’चा सावळा गोंधळ; परीक्षार्थींना मनस्ताप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे (बार्टी) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकरिता प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता प्रशिक्षणपूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु वर्ध्यातील दोन केंद्रांपैकी एका केंद्रावर कमी प्रश्नपत्रिका पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. एका केंद्रावर परीक्षा आटोपली पण, दुसऱ्या केंद्राकरिता पुरेशा प्रश्नपत्रिका नसल्याने वर्ध्यातील दोन्ही केंद्रांवरील परीक्षा पुढे ढकलण्यात आली. बार्टीच्या या सावळ्या गोंधळामुळे परीक्षार्थ्यांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागला.
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्यावतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकरिता भारतीय सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून सहा महिन्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाकरिता वर्धा जिल्ह्यातील १५० विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी प्रशिक्षणपूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. वर्ध्यातील यशवंत आर्टस कॉलेज व लोकमहाविद्यालय असे दोन परीक्षा केंद्र असून या परीक्षेकरिता जिल्ह्यातून १ हजार ११८ युवक-युवतींनी आवेदन केले होते. त्यामुळे बार्टीकडे १ हजार ११८ परीक्षार्थ्यांकरिता प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेची मागणीही संबंधित संस्थेने केली होती. रविवारी दोन्ही परीक्षा केंद्रावर परीक्षेकरिता परीक्षार्थी व कर्मचारी उपस्थित राहून परीक्षेला सुरुवात करण्यात आली. यशवंत आर्टस कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या. त्याच दरम्यान लोक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वितरित करत असताना प्रश्नप्रत्रिका कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला. त्यामुळे लागलीच बार्टीच्या प्रशिक्षण केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संतप्त विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत वर्ध्यातील दोन्ही केंद्रावरील पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेत झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. परंतु, या परीक्षेकरिता खेड्यापाड्यातून आलेल्या परीक्षार्थ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला.

पेपर फुटल्याची उडविली बोंब...
- वर्ध्यातील लोकमहाविद्यालय आणि यशवंत आर्टस कॉलेज या दोन्ही परीक्षा केंद्रावर प्रशिक्षणपूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यशवंत कॉलेजच्या केंद्रावर ६०० ते लोक महाविद्यालयातील केंद्रावर ५९८ परीक्षार्थ्यांची व्यवस्था होती. सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत ही परीक्षा होती. त्यानुसार यशवंत महाविद्यालयात वेळेमध्ये परीक्षा सुरू होऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वितरित करण्यात आली होती. मात्र, लोकमहाविद्यालयात प्रश्नपत्रिकाच कमी पडल्याने पुढील प्रक्रियाच थांबविण्यात आली. एक तासांत यशवंतमधील पेपर संपला पण, लोकमहाविद्यालयातील पेपरच सुरू झाला नसल्याने काहींनी झालेला पेपर सोशल मीडियावर व्हायरल करून फुटल्याची बोंब ठोकली. पण, अधिकाऱ्यांनी दोन्ही केंद्रावरील आजचा पेपर रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले.

परीक्षार्थी १ हजार १९८, प्रश्नपत्रिका केवळ ७५० 
- जिल्ह्यातील १ हजार १९८ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणपूर्व परीक्षेकरिता आवेदन पत्र भरले होते. त्यामुळे जिल्ह्यातील दोन केंद्रांवर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेकरिता १ हजार १९८ परीक्षार्थी असल्याने तेवढ्याच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक होते. परंतु जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर ६०० ते दुसऱ्या परीक्षा केंद्रावर १५० अशा केवळ ७५० च प्रश्न पत्रिका उपलब्ध झाल्याने सारा गोंधळ निर्माण झाला.

सहा महिन्याच्या मोफत प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आज प्रशिक्षणपूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दोन केंद्रावरून ही परीक्षा होणार होती. परंतु एका परीक्षा केंद्रावर कमी प्रश्न पत्रिका पोहोचल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. कोण्याही परीक्षार्थ्यांची संधी हिरावल्या जाणार नसून लवकरच परीक्षा केंद्राच्या उपलब्धतेनुसार ही परीक्षा पुन्हा घेण्यात येईल.
- भूषण रामटेके, परीक्षा प्रभारी, प्रशिक्षण केंद्र बार्टी.
 

 

Web Title: 'Barty''s shadow confusion; Exams suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा