एकाच विहिरीचा अनेक कुटुंबांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:02 PM2019-04-08T22:02:30+5:302019-04-08T22:04:16+5:30
सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यातच आदर्शनगरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. अशातच थोडे पाणी असलेली विहीर अनेक कुटुंबाला आधार देणारी ठरत आहे; पण जोरदार पाऊस येत भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने तेथील नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. सध्या काही विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यातच आदर्शनगरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. अशातच थोडे पाणी असलेली विहीर अनेक कुटुंबाला आधार देणारी ठरत आहे; पण जोरदार पाऊस येत भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने तेथील नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. सध्या काही विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आदर्शनगरवासियांना सध्या तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातही चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाणी साठवून ठेवणार तरी किती असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. सेवाग्राम ग्रा.पं.च्या प्रभाग ३ मधील हा भाग असून कष्टकऱ्यांची वसाहत अशीच या परिसराची ओळख आहे. स्वतंत्र पाणी व्यवस्था असली तरी प्रत्येक उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागते. असे असले तरी त्यावर कायमस्वरूपी तोडगा न काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे.
या भागात तीन हॅन्डपंप आहेत. त्यापैकी एक हॅण्डपंप कोरडा झाला आहे. याच भागात एक विहीर असून या एकाच विहिरीवर तब्बल १४ मोटारी बसविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या भागातील रहिवासी इतरांना विहिरीतील पाणी घेऊ देत नसल्याने नागरिकांची समस्या लक्षात घेऊन ग्रा.पं. प्रशासनाने याविषयी लक्ष देण्याची गरज आहे. जलसंकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ग्रा.पं. प्रशासनाने विशेष पाऊल उचलण्याची मागणी आहे.